सलग सातव्या दिवशी तेजीची पताका फडकविणाऱ्या सेन्सेक्सने बुधवारी नव्या ऐतिहासिक टप्प्याला सर केले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- निफ्टीनेही या विक्रमाला साथ दिली. दोन्ही निर्देशांकाने त्यांच्या पंधरवडय़ापूर्वी केलेले उच्चांक मागे टाकले. सेन्सेक्स १२१.५३ अंशांच्या सरशीसह २६,१४७.३३ वर, तर निफ्टीनेही २७.९० अंश वाढ राखत ७,७९५.७५ हा विक्रम नोंदविला. सेन्सेक्सची सात दिवसांतील कमाई ४.५६ टक्क्यांची राहिली आहे.
भांडवली बाजार गेल्या सहा दिवसांपासून तेजीत आहे. बुधवारीही त्याने वाढ राखली. ती नोंदविताना निर्देशांकाने सर्वोच्च टप्पा गाठला. सेन्सेक्सने बुधवारी बंद होताना नवा उच्चांक गाठला असला तरी ८ जुलैचा २६,१९०.४४ हा व्यवहारातील सर्वोच्च टप्पा मात्र पार केला नाही. सत्रात तो २८,१८८.६४ पर्यंत मजल मारू शकला. निफ्टीने विक्रमी बंदबरोबर ८ जुलैचा ७,८०८.२० हा व्यवहारातील सर्वोच्च स्तर ७,८०९.२० द्वारे पार पाडला.
माहिती तंत्रज्ञान आणि बँक कंपनी समभागांमधील मागणीच्या जोरावर भांडवली बाजार बुधवारी तेजीत प्रवास करते झाले. निम्म्याहून अधिक महसूल मिळणाऱ्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील आकडेवारी उंचावलेली पाहून भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी मागणी नोंदविली. तर बँक क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक यांच्या समभागांना अधिक मूल्य मिळाले. सेन्सेक्समधील १७ समभाग तेजीत राहिले. तर क्षेत्रीय निर्देशांकात माहिती तंत्रज्ञान २.२ टक्क्यांनी वधारला.
गेल्या काही सत्रांपासून स्थानिक बाजार हे कंपन्यांच्या चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाही निकालांवर प्रतिसाद देत आहेत. विशेषत: सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपनी समभागांमध्ये विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा ओघ जुलैमध्ये वाढता राहिला आहे. बुधवारच्या सत्राच्या प्रारंभीपासूनच तेजी राखणाऱ्या मुंबई शेअर बाजारातील व्यवहारात मंगळवारच्या तुलनेत तब्बल १९० अंशांपर्यंत वाढ नोंदली जात होती. सत्राची अखेर करताना सेन्सेक्सने ७ जुलैचा २६,१०० टप्पा बाजूला सारला.  निफ्टीनेही मे २०१४ नंतर प्रथमच सलग सातवी तेजी राखली आहे.
नवीन उच्चांक
सेन्सेक्स    :    २६,१८८.०४
निफ्टी    :    ७,८०९.२०
जेट एअरवेज उंचावला
येत्या तीन वर्षांत कंपनी नफ्यात येईल, अशा व्यवस्थापनाच्या घोषणेने जेट एअरवेजचे समभाग मूल्य बुधवारी मुंबईच्या शेअर बाजारात ३ टक्क्यांनी उंचावले. २०१३-१४ मध्ये ४,१३० कोटी रुपयांचा तोटा जेट एअरवेजने सोसला आहे. बुधवारीच कंपनीत दुबईस्थित इतिहादने २४ टक्के हिस्सा उचलल्याचे घोषित केले. मुंबईच्या शेअर बाजारात जेटचा समभाग दिवसअखेर ३.४८ टक्क्यांनी वधारत २६४.९५ रुपयांवर गेला. व्यवहारात तो ५.७२ टक्के, २७०.७० रुपयांपर्यंत झेपावला होता. समभागात १०.९५ लाखांचे व्यवहार नोंदले गेले.
टीसीएसचे बाजारमूल्य अस्मानाला
माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या जोरावर नव्या उच्चांकाला गवसणी घालणाऱ्या मुंबई शेअर बाजारात याच क्षेत्रातील टीसीएसचे बाजार मूल्य बुधवारी ५ लाख कोटींच्या वर गेले. टाटा समूहातील ही १० अब्ज डॉलरची देशातील पहिल्या क्रमांकाची आयटी कंपनी आहे. सेन्सेक्समध्ये टीसीएसची बाजारमूल्याबाबत नेहमी सार्वजनिक कंपनी ओएनजीसीबरोबर स्पर्धा राहिली आहे. तर रिलायन्सबरोबर याबाबत टक्कर देणाऱ्या इन्फोसिसनेही बुधवारी सेन्सेक्सच्या तेजीत ६० टक्के वाटा राखला.

Story img Loader