सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर मुंबई शेअर बाजाराने मंगळवारी चांगलीच उसळी घेतली. बँकिंग, रिअल्टी आणि भांडवली वस्तूंच्या खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २२१ अंकांनी वधारला. त्यामुळे मंगळवारी बाजार बंद होताना हा निर्देशांक २५,२२८.६५ वर स्थिरावला.
गेल्या पाच दिवसांमध्ये मुंबई शेअर बाजाराची ११०० अंकांनी घसरण झाली होती. मात्र मंगळवारी बाजाराने ०.८९ टक्क्यांनी उसळी घेतली. स्मॉल कॅप आणि मिड कॅप कंपन्यांनीही दोन टक्क्यांची वाढ दर्शवली. किरकोळ गुंतवणूकदारांकडून वाढलेली मागणी हे याचे मुख्य कारण होते.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निर्देशांकात अर्थात निफ्टीतही ७२.५० अंकांची वाढ दिसून आली. मंगळवारी ०.९७ टक्क्यांची वाढ दर्शवीत हा निर्देशांक ७५२६.६५ वर स्थिरावला. ऑगस्ट महिन्यात रिझव्र्ह बँक आपले तिमाही पतधोरण जाहीर करणार आहे. महागाई निर्देशांकात झालेली घसरण लक्षात घेता या पतधोरणात व्याजाच्या दरांमध्ये कपात केली जाऊ शकते, अशी शक्यता काही ब्रोकर्सनी वर्तवली.
महागाईचा किरकोळ विक्री निर्देशांक ७.३१ टक्के झाला आहे. जानेवारी २०१२ पासून सलग ३० महिन्यांतील हा नीचांक आहे. त्या तुलनेत घाऊक किंमत निर्देशांक ५.४३ वर असून भाजीपाल्याच्या किमती हे याचे प्रमुख कारण मानले जात आहे. मंगळवारी रिअल्टी, बँकिंग आणि ऑटोमोबाइल या क्षेत्रांमध्ये खरेदीदारांनी बराच रस दाखवला. येत्या ५ ऑगस्ट रोजी रिझव्र्ह बँक तिमाही पतधोरण जाहीर करणार असून त्याकडे आता शेअर खेरदीदारांचे लक्ष लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा