जागतिक भांडवली बाजाराच्या नरमाईच्या तालावर सुरुवातीला तब्बल २०० अंशापर्यंत घसरणारा सेन्सेक्स मंगळवारअखेर करवसुलीबाबत व्यक्त झालेल्या निश्चिंतीने शतकी अंश भर नोंदविणारा ठरला.
९९.९६ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक २६,६८६.५१ वर पोहोचला, तर ३३.४० अंश वाढीमुळे निफ्टी ८०४७.३० वर स्थिरावला. सत्रात त्याने ८०००चा टप्पाही सोडला होता.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मंगळवारी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांवर लागू करण्यात येणाऱ्या मॅटबाबत जबरदस्तीने वसुली केली जाणार नाही, असे स्पष्ट केल्याने बाजारातील प्रमुख गुंतवणूकदारांना हायसे वाटले. परिणामी सुरुवातीची विक्री थांबवत त्यांनी बाजारात खरेदीचा जोर आरंभला.
त्याबरोबर वेधशाळेच्या नियमित मान्सून होण्याच्या आशेने तसेच मेमधील व्यापार तूट तिमाहीच्या तळात पोहोचल्याच्या चित्रानेही बाजारात अखेरच्या क्षणी चैतन्य पसरले. परिणामी व्यवहारात २६,३७९.९३ पर्यंत घसरणारा सेन्सेक्स दिवसअखेरपूर्वी २६,७३१.३५ पर्यंतही झेपावला. आशियाई बाजारात मात्र सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदली जात होती.
मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्समधील ३० पैकी २२ समभागांचे मूल्य वाढले. यामध्ये टाटा पॉवर, बजाज ऑटो, हिंदुस्थान यूनिलिव्हर, स्टेट बँक, एनटीपीसी, टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प यांचा क्रम राहिला. तर दुपापर्यंतच्या घसरणीच्या वातावरणामुळे दिवसअखेरही वेदांता, एचडीएफसी, डॉ. रेड्डीज लेबॉरेटरीसारखे समभाग मूल्य ऱ्हासीचे भागीदार ठरले.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक १.१८ टक्क्य़ांनी सर्वाधिक प्रमाणात विस्तारला. पाठोपाठ वाहन, बँक, ऊर्जा निर्देशांकातही ०.७३ टक्क्य़ांपुढील वाढ नोंदली गेली. स्मॉल व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.३४ व ०.७६ टक्क्य़ांपर्यंत वाढले.
रुपया २१ महिन्यांपूर्वीच्या तळात
* डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन – रुपयाच्या घसरणीचा प्रवास सलग चौथ्या व्यवहारातही कायम राहिला. गेल्या काही सत्रांपासून ६४च्या खालची पातळी गाठणारा रुपया मंगळवारी आणखी १० पैशांनी रोडावत ६४.२६ पर्यंत येऊन ठेपला. स्थानिक चलनाचा हा २१ महिन्यांपूर्वीचा तळ राहिला. यापूर्वी रुपया ६ सप्टेंबर २०१४ मध्ये ६५.२४ वर होता, तर गेल्या चार व्यवहारातील त्याचे अवमूल्यन हे ४२ पैशांचे राहिले आहे.
चर्चेतील समभागांची अस्वस्थ हालचाल
* कोटक महिंद्र, बायोकॉन, नेस्ले, रिलायन्स कम्युनिकेशन्स अशा चर्चेतील समभागांमध्येही मोठी हालचाल नोंदली गेली.
* सरकारने ५५ टक्क्य़ांपर्यंतच्या थेट विदेशी गुंतवणुकीची मर्यादा नाकारल्याने व्यवहारात २ टक्क्य़ांपर्यंत घसरणाऱ्या कोटक महिंद्र बँकेचा समभाग दिवसअखेर अवघ्या ०.०९ टक्क्य़ाने वाढून १२९०.९० रुपयांवर स्थिरावला.
* उपकंपनी सिन्जेन इंटरनॅशनलला सेबीची प्रारंभिक भागविक्रीची परवानगी मिळाल्याने औषधनिर्माण क्षेत्रातील बायोकॉनचा समभाग दिवसअखेर १.५३ टक्क्य़ांनी वाढून ४५३.७५ रुपयांपर्यंत गेला. सत्रात त्याने जवळपास ३ टक्के उसळीने ४६०चा पल्ला गाठला होता.
* रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या समभागात मात्र मंगळवारी नफेखोरीचे चित्र अनुभवले गेले. सिस्टेमा श्याम टेलिसव्‍‌र्हिसेस खरेदीच्या चर्चेने हा समभाग २.९७ टक्क्य़ांपर्यंत उसळला. दिवसअखेर मात्र तो ०.२५ टक्के घसरणीसह ५८.७० रुपयांवर स्थिरावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा