केंद्रात सुधारणावादी सरकार आल्याची भावना बाळगत विदेशी संस्था गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या कामगिरीने सेन्सेक्सला २०१४-१५ मध्ये गेल्या सहा अर्थ वर्षांतील सर्वोत्तम झेप नोंदविता आली. मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक मावळत्या आर्थिक वर्षांत तब्बल २४.८८ टक्क्य़ांनी उंचावला आहे.
मुंबई शेअर बाजाराचा आर्थिक वर्ष २०१४-१५ च्या अखेरचा व्यवहार मात्र नकारात्मक स्थितीत नोंदला गेला. मंगळवारच्या सत्रातील सुरुवातीच्या जवळपास २०० हून अधिक अंशांची वाढ गुंतवणूकदारांच्या नफेखोरीत परावर्तित होत सेन्सेक्सने सप्ताहारंभाच्या तुलनेत अवघी, मात्र १८.३७ अंश घसरण राखली. निर्देशांक २७,९५७.४९ वर बंद झाला.
एकूण भांडवली बाजार नरमला असला तरी मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांकांनी किरकोळ, अनुक्रमे ०.३१ व ०.८८ टक्के वाढ नोंदविली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १.३० अंश घसरणीसह ८,४९१ या ८,५०० च्या काठावरील टप्प्यावर विसावला. आर्थिक वर्षांत निफ्टीनेही २७ टक्के मजल मारली आहे.
प्रमुख निर्देशांकांनी २००९-१० नंतर यंदाच्या कालावधीत सर्वोत्तम कामगिरी बजाविली आहे. आर्थिक वर्ष २०१४-१५ च्या शेवटच्या मार्च महिन्यात सेन्सेक्स ४.८ टक्क्य़ांनी घसरला आहे. मासिक तुलनेत मार्चमध्ये फेब्रुवारी २०१३ नंतर सुमार कामगिरी नोंदविली गेली आहे. एकूण अर्थ वर्षांत सेन्सेक्स ५,५७१.२२ अंशांनी वाढला आहे. ३१ मार्च २०१४ अखेर मुंबई निर्देशांक २२,३८६.२७ वर होता. निर्देशांकाने ४ मार्च २०१५ रोजी सर्वोच्च ३०,०२४.७४ चा टप्पा गाठला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २०१४-१५ दरम्यान २६.६५ टक्क्य़ांनी वाढला आहे. वर्षभरात तोही ४ मार्च रोजीच ९,११९.२० पर्यंत गेला होता.
निर्देशांकांची सहा वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी
केंद्रात सुधारणावादी सरकार आल्याची भावना बाळगत विदेशी संस्था गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या कामगिरीने सेन्सेक्सला २०१४-१५ मध्ये गेल्या सहा अर्थ वर्षांतील सर्वोत्तम झेप नोंदविता आली.
First published on: 01-04-2015 at 06:15 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex give best performance of last six years