महिन्यातील वायदापूर्तीपूर्वीच्या व्यवहारात बुधवारी भांडवली बाजारांनी संमिश्र हालचाल नोंदविली. अवघ्या २.७६ अंशांनी घसरत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २६,२१०.६८ पर्यंत आला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकामध्ये मात्र नाममात्र वाढ नोंदविली गेली. २ अंशवाढीसह निफ्टी ८,०३४.८५ वर स्थिरावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जुन्या नोटा बाळगणाऱ्यांकरिता तुरुंगवास घडविणाऱ्या आदेशाला भांडवली बाजारातील व्यवहारादरम्यान, बुधवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेल्या मंजुरीची दखल गुंतवणूकदारांनी घेतली नाही. दर डॉलरच्या तुलनेत बुधवारी भक्कम झालेल्या रुपयाकडेही त्यांच्याकडून फारसे लक्ष दिले गेले नाही.

नव्या आर्थिक वर्षांत किमान कर दररचना असेल, या केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या संकेताने मंगळवारी सेन्सेक्सने एकाच व्यवहारात तब्बल ४०६.३४ अंश वाढ नोंदविली होती. तर निफ्टीही ८,००० पुढे पोहोचत गेल्या सात महिन्यांच्या तळातून बाहेर आला होता.

बुधवारी बाजारातील व्यवहार तेजीसह सुरू झाले. सेन्सेक्स यावेळी २६,२४३.१९ या वरच्या टप्प्यावर होता. दुपापर्यंत त्याने सत्रातील २६,४१५.०५ अशी झेप घेतली. दिवसअखेर मात्र निर्देशांक मंगळवारच्या तुलनेत किरकोळ घसरणीसह स्थिरावला. निफ्टीलाही सत्रातील ८,१००.५५ या वरच्या टप्प्यानंतर दिवसअखेर मोठी वाढ नोंदविता आली नाही.

सेन्सेक्समध्ये रिलायन्स, टाटा स्टील, हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, पॉवरग्रिड, स्टेट बँक यांचे मूल्य घसरले. तर मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.८७ व ०.५३ टक्क्यांनी वाढले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex goes down and nifty goes up