व्यापार तसेच निर्यात क्षेत्रातील देशाच्या गेल्या महिन्यातील निराशाजनक कामगिरीवर व्यवहाराच्या सुरुवातीला नकारात्मक प्रतिक्रिया देणारा भांडवली बाजार दिवसअखेर अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्ह बँकेच्या बैठक निर्णयाच्या आशेवर उंचावला. १३१.३१ अंश वाढीसह सेन्सेक्स २४,६८२.४८ वर पोहोचला. तर ३८.१५ अंश भर टाकत निफ्टीला ७,५०० च्या काठावर, ७,४९८.७५ स्थिरावता आले.

परराष्ट्र व्यापार तुटीत विस्तार दाखविणारी तसेच निर्यातीत सलग १५ व्या महिन्यांत घसरण नोंदविणारी फेब्रुवारीची आकडेवारी मंगळवारी सायंकाळी जाहीर झाली. शेअर बाजारात त्याचे पडसाद बुधवारी सकाळी उमटले. सेन्सेक्सने २४,३५४.५५ हा सत्राचा तळ दुपारपूर्वीच गाठला होता. तर निफ्टीने व्यवहारात ७,५०० चा टप्पाही सोडला. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हच्या बैठकीत व्याजदराबाबत होणाऱ्या सकारात्मक निर्णयाने बाजारात दिवसअखेर तेजी आली.

स्थावर मालमत्ता नियामक व विकास विधेयक, २०१३ लोकसभेत मंगळवारी मंजूर झाल्यानंतर त्याला शेअर बाजारातील या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये संमिश्र पडसाद उमटले. एनबीसीसी, शोभा, महिंद्र लाइफस्पेस, फिनिक्स मिल्स, डीएलएफ यांचे समभाग वाढले. तर प्रेस्टिज इस्टेट, एचडीआयएल, डी बी रिअ‍ॅल्टी, युनिटेक आदी घसरले.

दरम्यान, चलन विनिमय मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी १६ पैशांनी उंचावत ६७.२२ वर पोहोचला. यामुळे गेल्या दोन व्यवहारांतील त्याची घसरणही थांबली. या दोन दिवसात रुपया ३३ पैशांनी घसरला आहे.

धातू समभाग घसरले

अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेली व १ मार्च २०१६ पासून लागू झालेली मौल्यवान धातूवरील उत्पादन  कराची मात्रा मागे न घेण्याबाबतची सरकारची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर बाजारात या क्षेत्रातील समभाग घसरले. यामध्ये राजेश एक्स्पोर्ट्स (-११.७०%), टीबीझेड (-२.७१%), पीसी ज्वेलर्स (-२.४०%), टायटन (-१.२१%) यांचा लक्षणीय समावेश राहिला.

औषध समभागांत निराशा

सरकारच्या र्निबध धोरणानंतर बाजारात उमटलेली औषध कंपन्यांच्या समभागांमधील मूल्य निराशा बुधवारीही कायम राहिली. बाजारात सूचिबद्ध अनेक औषध उत्पादक कंपन्यांचे समभाग ४ टक्क्यांपर्यंत घसरले. आरपीजी लाइफ सायन्सेस (-३.९६%), मार्कसन्स फार्मा (-३.३७%), शेरॉन बायोमेडिसिन (-३.३५%) यांचा समावेश होता.

Story img Loader