भांडवली बाजारातील तेजी सलग दुसऱ्या दिवशी कायम राहिली. ४७.०४ अंश वाढीसह ‘सेन्सेक्स’ १९,६०८.०८ वर पोहोचला. तर १०.४५ अंश वाढीमुळे ‘निफ्टी’ ५,९३२.९५ पर्यंत गेला.
शेअर बाजारातील वधारणेला बुधवारी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी हातभार लावला. देशातील निर्यात वर्षांच्या सुरुवातीला किरकोळ प्रमाणात का होईना वाढती राहिल्याने एकूणच हा निर्देशांक १.२९ टक्क्यांनी उंचावला. त्यातील टीसीएसचा समभाग सर्वाधिक (१.५८%) वरच्या स्थानावर होता. ‘सेन्सेक्स’मध्ये मोलाची कामगिरी बजावणारा इन्फोसिसही आज वधारला. पाठोपाठ वाहन, तेल व वायू निर्देशांकही तेजीत होता. तेल व वायू निर्देशांकानेही कालच्या सत्रात ‘सेन्सेक्स’च्या शतकी वाढीत सिंहाचा वाटा उचलला.
‘सेन्सेक्स’मधील १३ समभाग तेजीत होते. रिलायन्सचे मूल्य ०.२६ टक्क्यांनी वधारून ८७८.२५ पर्यंत गेले. टाटा मोटर्सच्या गुरुवारी जाहीर होणाऱ्या तिमाही कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर या समभागाबाबत बाजारात सकारात्मकता दिसून आली. जग्वार लॅण्ड रोव्हरच्या वाढत्या वाहन विक्रीमुळे टाटा मोटर्सचा समभाग २.११ टक्क्यांनी वधारला.
आयटी चमकदार
एचसीएल टेक्नॉ. ७०७.५५ +४.३०%
इन्फोसिस २,७८९.३० +१.२६%
महिंद्र सत्यम ११७.४५ +१.१६%
टीसीएस १,४३०.५५ +१.५८%
टेक महिंद्र ९९९.९० +०.९७%
आयटी निर्देशांक ६,४९७.७९ +१.२९%