रिझव्‍‌र्ह बँकेच्या येत्या महिन्यातील पतधोरणनिश्चितीसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदर वाढ टाळण्याच्या संकेताने देशातील भांडवली बाजारांनी गुरुवारी एकदम उसळी घेतली.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एकदम ५१६.५३ अंशांनी वाढून २६,२३१.१९ पर्यंत पोहोचला, तर निफ्टीतील १५७.१० अंशवाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ७,९४८.९५ वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांमध्ये दोन टक्क्य़ांहून अधिक वाढ नोंदली गेली.
डॉलरच्या तुलनेत ६६ पर्यंत भक्कम होत असलेल्या रुपयानेही निर्देशांकाच्या तेजीत भर टाकली. दिवसअखेर स्थानिक चलन १० पैशांनी भक्कम बनत ६६.०४ पर्यंत झेपावले, तर मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅपही २.५ टक्क्य़ांपर्यंत उसळले.
फेडरल रिझव्‍‌र्हचे अध्यक्ष विल्यम डुडले यांनी व्याजदरवाढीबाबत तूर्त विराम घेण्याचे बुधवारी उशिरा जाहीर केले. मध्यवर्ती बँकेचे आगामी पतधोरण २९ सप्टेंबर रोजी आहे. (याच धोरणावर आधारित रिझव्‍‌र्ह बँकेचाही व्याजदराबाबत आगामी निर्णय अपेक्षित आहे.)
भारतीय भांडवली बाजारांचा गुरुवार हा महिन्यातील वायदा पूर्तीच्या व्यवहारांचा अखेरचा दिवस होता. बुधवारच्या अमेरिकेच्या तेजीतील बाजार व्यवहाराच्या जोरावर प्रामुख्याने चिनी बाजारांनीही दोन महिन्यांतील उसळी घेतली.
या साऱ्यांचा परिणाम मुंबई शेअर बाजारात गुरुवारी सुरुवातीपासूनच दिसून आला. सेन्सेक्स या वेळी थेट ४५५ अंशांनी उंचावत २६ हजारांवर पोहोचला, तर बुधवारच्या तुलनेत १४० अंशवाढीने निफ्टीने ७,९०० चा टप्पा पार केला.
दिवसभर तेजीवर स्वार सेन्सेक्सचा सत्रात २६,३०२.७७ असा उच्चांक राहिला, तर सत्रशेवटी ८,००० नजीक पोहोचणाऱ्या निफ्टीचा प्रवास व्यवहारात ७,९६३.६० उच्चांकापर्यंत गेला होता. दिवसअखेरची मुंबई निर्देशांकाची ५०० हून अधिक अंशांची झेप ही १४ ऑगस्ट २०१५ नंतरची (+५१७.७८) सत्रातील सर्वात मोठी झेप ठरली आहे.
सेन्सेक्समधील २१ समभागांचे मूल्य वाढले. एचडीएफसी, वेदांता, टाटा स्टील, ल्युपिन, सिप्ला यांना मागणी राहिली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू, स्थावर मालमत्ता, आरोग्य निगा, तेल व वायू आघाडीवर राहिले. मुंबई शेअर बाजाराने २४ सप्टेंबर रोजी एकाच व्यवहारात तब्बल १,६२४ अंश आपटी नोंदवीत इतिहासातील तिसरी मोठी घसरण राखली होती, तर १७ ऑगस्टपासून सेन्सेक्स २,०३० अंशांनी रोडावला होता.

Story img Loader