भांडवली बाजाराची संमिश्र वाटचाल आठवडय़ातील सलग दुसऱ्या दिवशीही कायम राहिली. किरकोळ वाढीसह सेन्सेक्स नव्या उच्चांकावर पोहोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने मंगळवारी पुन्हा नाममात्र घसरण दाखविली.
सेन्सेक्स ५.७९ अंश वधारून २६,४४२.८१ वर पोहोचला, तर निफ्टीत १.५५ अंश घसरण होऊन निर्देशांक ७,९०४.७५ पर्यंत खाली आला. व्यवहारात सेन्सेक्सने २६,४८१.९७ पर्यंत झेप नोंदविली. सलग चार व्यवहारांत तेजी नोंदविणाऱ्या सेन्सेक्सने नव्या उच्चांकासह १२८ अंशांची भर राखली आहे.
बाजारात मंगळवारी पोलाद आणि वाहन कंपन्यांचे समभाग काहीसे सावरताना दिसले. कोळसा खाणी रद्द केल्याच्या घटनेमुळे पोलाद कंपन्यांच्या समभाग मूल्यांवर सोमवारी दबाव निर्माण झाला होता, तर स्पर्धा आयोगाच्या दंडामुळे वाहन कंपन्यांचे समभाग मंगळवारच्या व्यवहारात मोठय़ा फरकाने आपटले होते.
सोमवारच्या व्यवहारात १४ टक्क्यांपर्यंतची आपटी नोंदविणारे हिंदाल्को, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, हिंदुस्थान झिंक, सेल हे मंगळवारच्या नीचांकातून बाहेर आले. एकूण सेन्सेक्स वधारला असला तरी जिंदाल स्टील, भूषण स्टील हे मात्र घसरणीतून बाहेर पडण्यास असमर्थ ठरले.
दंडामुळे वाहन कंपन्यांचे समभाग घसरले
भारतीय स्पर्धा आयोगाकडून विविध १४ वाहन उत्पादक कंपन्यांना ठोठाविण्यात आलेल्या दंडामुळे भांडवली बाजारातस सूचिबद्ध असलेल्या वाहन कंपन्यांचे समभाग मंगळवारी ३ टक्क्यांपर्यंत घसरले. टाटा समूहातील टाटा मोटर्सचा समभाग वगळता इतर सर्व वाहन कंपन्यांचे समभाग २ टक्क्यांपर्यंत घसरले. टाटा मोटर्सचा समभाग व्यवहारात २ टक्क्यांपर्यंत आपटल्यानंतर दिवसअखेर केवळ ०.९० टक्क्याने वधारला,  तर हिंदुस्थान मोटर्स (-२.३८%), मारुती सुझुकी, (-०.९६), महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र (-०.४५%) घसरले. वाहनांच्या सुट्टय़ा भागाबाबत सेवा प्रदान केल्यानंतर नियमांचे पालन न केल्याप्रकरणी कंपन्यांना ठोठावण्यात आलेल्या दंडाचे प्रमाण हे त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या २ टक्के इतके आहे.
ऊर्जा समभागांची लोळण
कोळसा खाणींचे वाटप रद्द करण्याच्या सोमवारच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून मंगळवारी खनिकर्म क्षेत्रातील कंपन्या भांडवली बाजारात सावरल्या असल्या तरी ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांनी मात्र आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात लोळण घेतली. या क्षेत्रातील समभाग ७ टक्क्यांपर्यंत आपटले. अनिल धीरुभाई अंबानी समूहातील रिलायन्स पॉवरचा समभाग ६.७९ टक्क्यांनी घसरला, तर अदानी पॉवरचे समभाग मूल्यही ६.४४ टक्क्यांनी आपटले. त्याचबरोबर टाटा पॉवर २.७७, एनएचपीसी १.८७, टोरन्ट पॉवर १.८४, एनटीपीसी ०.६३ टक्क्यांनी घसरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा