मुंबई : जागतिक बाजारातील प्रतिकूलतेपायी गेल्या काही सत्रात होरपळलेल्या देशांतर्गत भांडवली बाजाराने सप्ताहअखेर एक टक्क्यांहून अधिक तेजी दर्शविली. जागतिक बाजारातील तेजीचे प्रतििबब आणि समभाग पुनर्खरेदी योजनेची घोषणा करणाऱ्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी आणि निर्देशांकांतही वजनदार स्थान असणारा इन्फोसिसचा समभाग वधारला.
खरेदीचे पाठबळ मिळाल्याने बँकिंग व माहिती-तंत्रज्ञानातील समभाग वधारल्याचा परिणाम म्हणून शुक्रवारच्या सत्रात एकेसमयी सेन्सेक्सने १,२०० अंशांची झेप घेतली. सकाळच्या सत्रात त्याने १,१९९.७९ अंशांची वाढ दर्शवत, ५८,४३५.१२ या उच्चांकाला गवसणी घातली. होती. तथापि उत्तरार्धात नफावसुलीसाठी बाजारात विक्रीला जोर चढल्याचेही दिसून आले. परिणामी दिवसअखेर सेन्सेक्स ६८४.६४ अंशांनी म्हणजेच १.२० टक्क्यांनी तेजी दर्शवीत ५७,९१९.९७ पातळीवर बंद झाला. दुसरीकडे निफ्टीमध्ये १७१.३५ अंशांची (१.०१ टक्के) वाढ झाली आणि तो १७,१८५.७० पातळीवर स्थिरावला.
अमेरिकी बाजारातील आश्चर्यकारक उसळीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या सत्रात देशांतर्गत बाजाराने तेजी दाखवली. महागाई दर अपेक्षेपेक्षा अधिक राहिल्याने सुरुवातीला अमेरिकी बाजार घसरला. मात्र बाजारात निर्माण झालेल्या ‘अतिविक्री’च्या तांत्रिक स्थितीमुळे तो पुन्हा लवकर सावरला. देशांतर्गत बाजारात मूल्यवान कंपन्यांचे समभाग तेजीत होते. तसेच माहिती-तंत्रज्ञान आणि बँकांच्या दुसऱ्या तिमाहीतील चांगल्या आर्थिक कामगिरीमुळे तेजीवाल्यांनी बाजाराचा ताबा घेतला. सणोस्तवाच्या काळातील वाढती मागणी, दुसऱ्या तिमाहीतील कंपन्यांची दमदार कामगिरी आणि जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक कल यामुळे अल्पावधीसाठी बाजारात तेजी सुरू राहू शकते, असे मत जिओजित फायनान्शियल सव्र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.