भांडवली बाजाराची सप्ताह सुरुवात सोमवारीदेखील तेजीसह राहिली. सलग पाचव्या व्यवहारात निर्देशांकात भर घालताना सेन्सेक्स २०,५०० च्या पुढे कायम राहिला. वाढती महागाई आणि कमी औद्योगिक उत्पादन दर असूनही माहिती तंत्रज्ञानसारख्या समभागांच्या खरेदीने ७८.९५ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक २०,६०७.५४ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १६.५० अंश वाढीसह ६ हजाराच्या पुढे जाताना ६,११२.७० वर गेला. बांडवली बाजाराचा हा गेल्या तीन आठवडय़ातील उच्चांक होता. नव्या सप्ताहाची सुरुवात करताना सेन्सेक्स तेजीतच होता. गेल्या तीनही सत्रात त्याने वाढ नोंदविली आहे. २०,५०० च्या पुढे असणारा सेन्सेक्स दिवसभरात २०,६४५.९४ पर्यंत पोहोचला. यापूर्वी १९ सप्टेंबर रोजी २०,६४६.६४ या उच्चांकी टप्प्यावर होता. तर त्याचा दिवसाचा उच्चांकी टप्पाही याच पातळीवर सोमवारी नोंदला गेला.  शुक्रवारी भांडवली व्यवहारानंतर जाहिर झालेला ऑगस्टमधील ०.६ टक्के औद्योगिक उत्पादन दर आणि सोमवारच्या व्यवहारा दरम्यानच स्पष्ट झालेला सप्टेंबरमधील ६.४६ टक्के महागाई दर याचे काहीसे पडसाद उमटल्याने भांडवली बाजाराने अधिक गती घेतली नाही. उलट इन्फोसिसचा निकाल आणि आगामी प्रवास याच्या जोरावर एकूणच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी समभागांची खरेदी झाली. टाटा समूहातील टीसीएसचाही मंगळवारीच निकाल असल्याने त्याच्या समभागालाही ४.२ टक्के अधिक मूल्य मिळाले. एकूणच हा निर्देशांक २.३ टक्क्य़ांनी वधारला. सोमवारी सायंकाळी उशिरा वित्तीय निष्कर्ष जाहिर होणाऱ्या रिलायन्सचा समभागही ०.८४ टक्क्य़ांनी वाढला.

Story img Loader