भांडवली बाजारातील निर्देशांक गुरुवारी काहीसे वाढत सप्ताहाच्या उच्चांकाला पोहोचली. ४९.७१ अंश वाढीसह सेन्सेक्स २०,३१०.७४ वर तर निफ्टी १३.९० अंश वधारणेसह ६,०३६.३० वर पोहोचला.
गेल्या तीनही व्यवहारात मुंबई शेअर बाजार १०१.४८ अंशांनी वधारला आहे. तत्पूर्वी सहा सत्रात तो १,१०० अंशाने घसरला आहे. गुरुवारच्या वधारणेमुळे मुंबई निर्देशांक २०,५१३.८५ या ३१ जानेवारी २०१४ या टप्प्यानजीक आहे.
व्यवहारातील दिवसाची सुरुवात काहीशी नकारात्मक झाल्याने सेन्सेक्स २०,०७९.८२ पर्यंत खाली आला. यानंतर ग्राहकोपयोगी वस्तू, पोलाद क्षेत्रातील समभागांची मागणी नोंदली गेल्याने मुंबई निर्देशांक सत्रात २०,३५८.१९ पर्यंत उंचावला.
हिंदुस्तान यूनिलिव्हर, आयटीसी, टाटा स्टील, कोल इंडिया, हिंदाल्को यांचे समभाग वधारले. तर आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक, इन्फोसिस, टीसीएसमध्ये नफेखोरी झाल्याने ते सेन्सेक्समध्ये घसरलेले समभाग राहिले. सेन्सेक्समधील ३० पैकी १६  समभागांचे मूल्य वधारले. त्यात कोल इंडिया, टाटा पॉवर, हिंदुस्तान यूनिलिव्हर, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, मारुती सुझुकी, आयटीसी हे ४.६ ते १.७ टक्क्यांपर्यंत झेपावले होते.
आशियाई बाजारातील तेजीही येथील भांडवली बाजाराला साथ राहिली. जपानच्या निक्केई वगळता दक्षिण कोरिया, हाँगकाँग, सिंगापूर, तैवान येथील प्रमुख निर्देशांक वधारले.
रुपया उंचावला
चलन बाजारातील व्यवहारात गुरुवारी रुपयाचा प्रवास ‘रोलर-कोस्टर’वरील स्वारीसारखा चढ-उताराचा राहिला. चालू आठवडय़ातील पहिल्या दोन दिवसांच्या तेजीनंतर बुधवारी घसरलेले भारतीय चलन गुरुवारी पुन्हा डॉलरमागे २० पैशांनी उंचावले. डॉलरच्या तुलनेत रुपया ६२.३७ पर्यंत भक्कम झाला. बुधवारी रुपया ४ पैशांनी घसरला होता. तत्पूर्वीच्या सलग दोन दिवसातील त्याची वाढ १५ पैशांची होती.