‘फेड’ने तारले पण, बँक ऑफ जपानने मारले..
सलग तीन दिवस तेजीतून बुधवारी चालू वर्षांतील उच्चांकी शिखराला गवसणी घालणाऱ्या सेन्सेक्सने गुरुवारी मात्र ४६१ अंशांच्या घसरगुंडीचा गुंतवणूकदारांना दणका दिला. सेन्सेक्सची ही गत तीन सप्ताहातील सर्वात मोठी आणि पुन्हा २६ हजाराच्या पातळीखाली खेचणारी गटांगळी ठरली. एप्रिल महिन्याच्या वायदापूर्तीच्या दिवशी जपानच्या मध्यवर्ती बँकेने तेथील अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या उपाययोजना सुरू ठेवण्याबाबत सार्वत्रिक अपेक्षांच्या विपरीत दाखविलेल्या उदासीनतेने जगभरच्या सर्वच प्रमुख बाजारांसह स्थानिक भांडवली बाजाराचाही हिरमोड केला.
अगोदर अमेरिकेची मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हने अमेरिकी अर्थव्यवस्थेबाबत आशावादी सूर लावताना, व्याजाचे दर स्थिर ठेवून आपल्या बाजारासाठी सकारात्मक संकेत दिला होता. त्या उलट गुरुवारी सकाळी उरकलेल्या बँक ऑफ जपानच्या बैठकीने मात्र निराशा केली. बँक ऑफ जपानने व्याजदर कपातीची अपेक्षा असताना जैसे थे धोरणाचा पवित्रा घेतल्याने, सर्वच आशियाई बाजारांमध्ये त्याचे विपरीत पडसाद दिसून आले. सेन्सेक्सने २६ हजारांची पातळी तोडण्यासह, निफ्टीनेही भावनिकदृष्टय़ा महत्त्वाची असलेली ७,९००च्या पातळीखाली गुरुवारच्या व्यवहाराअंती १३२ अंश खाली ७,८४७.२५ अंशांवर विश्राम घेतला. वायदापूर्तीचा दिवस असल्याने सावधगिरी बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांच्या भावनांना प्रतिकूल बाह्य़ घडामोडींनी आणखीच धक्का पोहचविला. गेल्या सलग तीन व्यवहारातील मुंबई निर्देशांकातील झेप ही ३२८ अंशांची राहिली आहे. मंगळवारी तर सेन्सेक्समध्ये एकाच सत्रात ३०० हून अधिक अंशांची झेप नोंदली गेली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा