मुंबई शेअर बाजार (बीएसई) या देशातील जुन्या भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकत्रित बाजारमूल्यही नवीन मैलाचा दगड पार करीत आहे. हे एकत्रित बाजारमूल्य आता १०० लाख कोटी रुपयांच्या (१.५८ अब्ज डॉलर) उंबरठय़ावर आहे.
विद्यमान २०१४ सालात आतापर्यंत सेन्सेक्स ३१.८६ टक्क्यांनी (६,७४५.२०) उंचावला आहे. तर बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी त्याने २८ हजारांवरील, २८,०१०.३९ हा व्यवहारातील सर्वोच्च टप्पा गाठला आहे. एकूणच तेजीतील प्रवासामुळे बाजारातील कंपन्यांचे एकूण बाजार मूल्य ९७,१३,१९६ कोटी रुपयांवर गेले आहे. १०० लाख कोटी रुपयांना स्पर्श करण्यास तूर्त २.८६ लाख कोटी रुपयांची तफावत आहे. मुंबई शेअर बाजाराने १०० लाख कोटी रुपयांचा टप्पा सर्वप्रथम जून २००७ मध्ये पार केला होता. मात्र सप्टेंबर २००८ मध्ये तो या स्तरापासून दुरावला. अमेरिकेत उद्भवलेल्या आर्थिक मंदीचे निमित्त त्या वेळी होते. मात्र मे २००९ मध्ये बाजारातील कंपन्यांनी पुन्हा १०० लाख कोटी रुपयांना गाठले. २०१२ मध्ये  ऑगस्ट महिन्याचा अपवाद केल्यास तो या स्तरावर कायम होता.