तिमाही उच्चांकावर पोहोचलेल्या भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी गुरुवारी केलेल्या विक्रीपोटी दोन्ही प्रमुख निर्देशांक त्याच्या उल्लेखनीय टप्प्यापासून ढळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३४.०९ अंशांनी घसरून २८,५०० च्याही खाली, २८,३७०.८४ वर आला. तर ४३.७० अंश घसरणीने निफ्टी ८,६००चा टप्पा सोडत ८,५८९.८० वर स्थिरावला.
औषधनिर्मिती क्षेत्रातील ल्युपिन तसेच वाहन उत्पादनातील बजाज ऑटोच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांनी बाजाराची निराशा केली. व्यवहारात २० पैशांपर्यंत घसरणाऱ्या रुपयाचाही बाजारात परिणाम झाला. बुधवारच्या व्यवहारात बाजार वस्तू व सेवा कर विधेयकाच्या रूपात अर्थसुधारणेला चालना मिळण्याच्या आशेने १६ नंतर प्रथमच वरच्या टप्प्यावर होता.
बुधवारी सेन्सेक्सने २८,५०० पुढे जात त्रिशतकी वाढ नोंदविली होती, तर निफ्टी ८,६००च्या वर प्रवास करताना त्याच्या तिमाहीतील वरच्या स्तरावर होता. गुरुवारची सेन्सेक्सची सुरुवात २८,५७८.३३ वरील तेजीने झाल्यानंतर मुंबई निर्देशांक सत्रात २८,३१५.३७ पर्यंत घसरला, तर निफ्टीने सत्रात ८,६५४.७५ ते ८,५७३.८०चा प्रवास नोंदविला.
सेन्सेक्समधील ल्युपिनचा समभाग सर्वाधिक, ५.२३ टक्क्यांनी घसरला. कंपनीने चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीत १६ टक्क्यांची घसरण नोंदविली आहे. बजाज ऑटोने ३७ टक्क्यांची नफ्यातील वाढ राखली असली तरी ती विश्लेषकांच्या अंदाजापेक्षा कमी असल्याचे निमित्त झाल्याने कंपनीचा समभागही ५ टक्क्यांनी घसरला.
सेन्सेक्सच्या एकूण घसरणीत टाटा स्टील, टीसीएस, भारती एअरटेल, हिंदुस्थान युनिलिव्हर, लार्सन अॅण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, सन फार्मा, वेदांता, इन्फोसिस यांचा क्रम लागला. सेन्सेक्समधील १८ समभागांचे मूल्य रोडावले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ०.७९ टक्क्यांनी तंत्रज्ञान निर्देशांक आघाडीवर राहिला.
नफेखोरीने सेन्सेक्स, निफ्टीची माघार
तिमाही उच्चांकावर पोहोचलेल्या भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी गुरुवारी केलेल्या विक्रीपोटी दोन्ही प्रमुख निर्देशांक त्याच्या उल्लेखनीय टप्प्यापासून ढळले.
First published on: 24-07-2015 at 01:59 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex nifty down