नव्या वर्षांत पहिल्यांदाच २८ हजार आणि ८,४०० या अनोख्या टप्प्याला गाठल्यानंतर प्रमुख भांडवली बाजारांनी सप्ताहारंभीच गेल्या सलग सहा व्यवहारांनंतर पहिली घसरण नोंदविली. महिन्याच्या उच्चांकाला पोहोचलेल्या भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी नफेखोरी करत सत्रअखेर किरकोळ घसरण राखली. ४५.५८ अंश घसरणीसह सेन्सेक्स २७,७८६.८५ वर तर १७.०५ अंश घसरणीसह निफ्टी ८,३७८.४० वर बंद झाला.
नव्या सप्ताहाला प्रारंभ करत मुंबई शेअर बाजाराचा मुंबई निर्देशांक सकाळीच २८ हजारावर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही ८,४००चा टप्पा गाठला. बाजारांचा हा टप्पा ९ डिसेंबरनंतरचा सर्वात वरचा स्तर होता. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या ओघामुळे सलग सातव्या व्यवहारातील वाढ या वेळी नोंदली जात होता. यापूर्वीच्या सहा व्यवहारांत सेन्सेक्स ६७९.२९ अंशांनी उंचावला होता.
दिवसभरात मुंबई निर्देशांक २८,०६४.४९ पर्यंत पोहोचला. गेल्या सप्ताहाअखेरपेक्षा ही वाढ १७५ अंशांपर्यंत होती. तर निफ्टीचा दिवसातील सर्वोच्च स्तर ८,४४५.६० होता. दुपारपूर्वीच बाजारात वरच्या टप्प्याला पोहोचल्याचा फायदा गुंतवणूकदारांनी घेणे सुरू केले आणि समभागांच्या विक्रीचे धोरण अनुसरले. सत्राच्या शेवटच्या टप्प्यात दिवसाचा नीचांक नोंदविल्यानंतर काहीसा सावरत मात्र शुक्रवारच्या तुलनेत निराशाजनक कामगिरी करत बाजाराची सोमवारची अखेर झाली.
नफेखोरीच्या दबावामुळे माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार, पोलाद, बँक क्षेत्रातील समभागांची विक्री झाली. तर मध्यंतरीच्या तेजीमुळे वाहन, ग्राहकोपयोगी वस्तू, भांडवली वस्तू क्षेत्रातील समभाग तेजीत राहिले. आठवडय़ाच्या शेवटी जाहीर होणाऱ्या तिमाही निकालामुळे इन्फोसिसचा समभाग घसरला. तर एचडीएफसी, टीसीएस, रिलायन्स, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, डॉ. रेड्डीज् लेबोरटरी, स्टेट बँक, हिंदाल्को, सेसा स्टरलाइट यांचेही मूल्य घसरले.
सेन्सेक्समधील निम्मे समभाग वधारले. तर स्थिर एनटीपीसीव्यतिरिक्त अन्य १४ समभागांचे मूल्य घसरले. त्यातही २.१९ टक्क्यांसह डॉ. रेड्डीज लेबोरटरी आघाडीवर राहिला. १ जानेवारीपासून उत्पादन शुल्कातील सवलत कपात रद्द झाल्याने वाहन क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग उंचावले. यामध्ये मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प यांचा क्रम राहिला.
‘आयआरबी’ची  ८.४% गटांगळी !
सीबीआय धाडींमुळे गुंतवणूकदारांत भीती
पायाभूत सेवा क्षेत्रातील आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या मुंबई, पुण्यातील २० कार्यालयांमध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने तपास मोहीम राबविल्याच्या वृत्ताने सोमवारी बाजारातील सूचिबद्ध कंपनीचे समभाग मूल्य व्यवहारात १० टक्क्यांहून अधिक प्रमाणात आपटले.
सत्रअखेर समभाग मूल्य ८.४३ टक्क्यांनी घसरत २४४.८० रुपयांवर आले. समभागाने यापूर्वी २८९.४० हा गेल्या वर्षभरातील उच्चांक तर ६८.०५ वर्षभरातील तळ गाठला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते सतिश शेट्टी यांनी आयआरबीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांच्या विरुद्ध जमीन खरेदीबाबत केलेल्या तक्रारीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या परवानगीनुसार तपास यंत्रणेने सोमवारी कंपनीच्या विविध कार्यालयांमध्ये तपास मोहीम राबविली.
शेट्टी यांनी तक्रार केल्यानंतर पुणेनजीकच्या तळेगाव येथे त्यांची २०१० मध्ये हत्या झाली. दोन वर्षांनंतर शेट्टी यांच्या कुटुंबीयांच्या मागणीनुरूप मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सुपूर्द केले.
कच्च्या तेलातील उतार कायम
मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरातील मोठी घसरण नव्या सप्ताहातही कायम राहिली आहे. ब्रेन्ट क्रूड सोमवारी प्रति पिंप ५५ डॉलरच्याही खाली आले. यामुळे काळ्या सोन्याचे दर आता गेल्या साडेपाच वर्षांच्या तळात विसावले आहेत. तर सप्ताह तुलनेत कच्च्या तेलाच्या दरात एकाच दिवसात एकदम दोन टक्क्यांची घसरण झाली आहे. जागतिक स्तरावर तेलाचा मुबलक पुरवठा उपलब्ध होत असल्याने दर किमान पातळीवर येत आहेत.
रुपया सप्ताह तळात
मुंबई: डॉलरच्या तुलनेत थेट १२ पैशांनी घसरत रुपया सोमवारी ६३.४१ या सप्ताह तळात पोहोचला. दिवसाच्या व्यवहाराची नरम सुरुवातीनंतर करणारा रुपया ६३.५० पर्यंत घसरला. व्यवहारात ६३.२८ पर्यंत उंचावूनही दिवसअखेर त्यात घसरण झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा