गेल्या सलग सहा व्यवहारातील तेजीमुळे नव्या उच्चांकाला पोहोचलेल्या भांडवली बाजारांना बुधवारी खीळ बसली. गुंतवणूकदारांच्या नफेखोरी धोरणाने सेन्सेक्ससह निफ्टीही त्यांच्या सार्वकालिक विक्रमापासून ढळला. १०६.३८ अंश घसरणीसह मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तर २२.२० अंश नुकसानासह निफ्टी खालावला. दोन्ही प्रमुख निर्देशांक अनुक्रमे २६,३१४.२९ व ७,८७५.३० वर बंद झाले. सलग सहा सत्रातील तेजीमुळे मुंबई निर्देशांकाने एक हजार अंशांची झेप घेतली होती. तर निफ्टीने ७,९०० ला स्पर्श केला होता.
स्मॉल कॅप, मिड कॅपसह एकूणच भांडवली बाजारात गंतवणूकदारांनी वधारत्या दरांवर आपल्याकडील समभागांची विक्री केली. यामध्ये तेल व वायू, वाहन, भांडवली वस्तू निर्देशांकही आले. बुधवारच्या व्यवहारात सेन्सेक्स सुरुवातीलाच २६,५०४.५२ पर्यंत गेला.
मुंबई निर्देशांकाचा व्यवहारातील सर्वोच्च स्तर मंगळवारी २६,५३०.६७ होता. तर बंदअखेर तो २६,४२०.६७ वर स्थिरावला होता. निफ्टीने गेल्या सहा व्यवहारात ३२९.२५ अंश भर राखली होती. तो निर्देशांकदेखील बुधवारी नकारात्मक स्थितीत नोंदला गेला. व्यवहारात निफ्टी ७,९०० च्या पल्याड, ७,९१५.८० पर्यंत गेला होता. सेन्सेक्समधील १९ समभागांचे मूल्य रोडावले.

Story img Loader