गेल्या सलग दोन सत्रांतील विक्रमी टप्पा कायम राखताना प्रमुख भांडवली बाजारांनी बुधवारी सत्रात पुन्हा नव्या विक्रमापर्यंत झेप घेतली. मात्र नफेखोरीमुळे निर्देशांकांची अखेर घसरणीने झाली. दरम्यान, बुधवारच्या सत्रातही सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच २५,७३५.८७ पर्यंत, तर निफ्टीने ७,७०० पल्याड ७,७००.०५ पर्यंत झेप दाखविली.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १०९.८० अंश घसरणीमुळे २५,४७३.८९ पर्यंत, तर निफ्टी २९.५५ अंश नुकसानापोटी ७,६२६.८५ पर्यंत घसरला. दिवसअखेर सेन्सेक्स त्याच्या सर्वोच्च पदावरून, तर निफ्टी ७,७०० वरून ढळला. प्रमुख निर्देशांकची ही गेल्या पाच दिवसांतील पहिली नकारात्मक कामगिरी ठरली.
ऐतिहासिक उच्चांकावर असणाऱ्या सेन्सेक्ससह निफ्टी बुधवारी व्यवहारादरम्यान कमालीच्या टप्प्यापर्यंत पोहोचला. यानंतर गुंतवणूकदारांनी नफेखोरीचा मार्ग अवलंबिला. त्यातच बुधवारी जाहीर झालेल्या देशाची मेमधील व्यापारी तूट गेल्या १० महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्याची धास्तीदेखील शेअर बाजारात उमटली, तर एप्रिलमधील औद्योगिक उत्पादन दराच्या गुरुवारी जाहीर होणाऱ्या आकडेवारीवरही नजर ठेवत गुंतवणूकदारांचे व्यवहार झाले. पुढच्या आठवडय़ाच्या सुरुवातीलाच मेमधील घाऊक किंमत निर्देशांक जारी होणार आहेत.
मुंबई निर्देशांकाने गेल्या सलग चार दिवसांत तेजी नोंदविली आहे. असे करताना सेन्सेक्स २५,७०० पर्यंत नव्या स्तरावर पोहोचला. या चार व्यवहारांतील त्याची भर ७७७.८६ अंश राहिली. बुधवारच्या व्यवहारातही तो दुपारपूर्वीच दिवसाच्या उच्चांकावर राहिला. यानंतरची घसरण निर्देशांकाला दिवसाच्या २५,३६५.६५ पर्यंतच्या नीचांकापर्यंत घेऊन गेली.
बुधवारच्या पहिल्या दीड तासाच्या तेजीतील व्यवहारानंतर नफेखोरी करताना गुंतवणूकदारांनी प्राधान्य देतोना पायाभूत, पोलाद, ऊर्जा क्षेत्रांतील समभाग निवडले. रिलायन्स, ओएनजीसी, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, स्टरलाइट, एनटीपीसी, भारती एअरटेल, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, टाटा मोटर्ससारखे समभागांचे मूल्य आपटले. सेन्सेक्समधील १७ समभागांना कमी भाव मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex nifty end flat after hitting record highs
Show comments