भांडवली बाजारात गुरुवारी सलग तिसऱ्या व्यवहारांत तेजी राहिली. मात्र सेन्सेक्ससह निफ्टीमध्ये बुधवारच्या तुलनेतील निर्देशांक वाढ किरकोळ नोंदली गेली.
६.४४ अंश वाढीसह सेन्सेक्स २४,४९२.३९ वर, तर १.६० अंश वाढीसह निफ्टी ७,४३७.७५ पर्यंत पोहोचला. डॉलरच्या तुलनेत ६८ रुपयांपुढे जाताना २९ महिन्यांतील नवा तळ गाठणाऱ्या स्थानिक चलनातील व्यवहाराची चिंताही बाजारात उमटली.
अमेरिकी फेडरल रिझव्र्हच्या शुक्रवारी होणाऱ्या पतधोरण बैठकीकडे लक्ष असलेल्या गुंतवणूकदारांनी गुरुवारी बाजारात फारसा सहभाग नोंदविला नाही. त्यामुळे महिन्यातील वायदापूर्तीच्या अखेरच्या व्यवहारात प्रमुख निर्देशांक नाममात्र वाढले.
गेल्या दोन व्यवहारांत सेन्सेक्स ५२३.७४ अंशांनी वाढला आहे, तर निफ्टीला त्याचा ७,४०० पुढील प्रवास कायम राखता आला. आंतरराष्ट्रीय बाजारात काही प्रमाणात वाढलेल्या खनिज तेल दराकडे बाजारातील व्यवहारादरम्यान दुर्लक्ष झाले.
सोने २७ हजारांकडे
लग्नसराईचा हंगाम नजीक येऊन ठेपल्याची पोच धातूंमधील दरवाढीने दिली आहे. गुरुवारी सोन्याचे दर तोळ्यामागे २७ हजार रुपयांपर्यंत झेपावले. मुंबईच्या सराफा बाजारात १० ग्रॅमसाठी सोने २८५ रुपयांनी वाढून २६,५००च्या पुढे, २६,७३० रुपयांपर्यंत गेले. तर राजधानी दिल्लीत सोने दराने एकाच व्यवहारात तोळ्यामागे ३८० रुपयांची वाढ नोंदविल्याने पिवळ्या धातूचा दर २७,१३० रुपयांवर पोहोचला. चांदीच्या दराने किलोसाठी ३५ हजारांचा टप्पा ओलांडला. दिल्लीत चांदी एक किलोमागे ७६० रुपयांनी वाढून ३५,२६० रुपयांपर्यंत तर मुंबईत ६२० रुपयांनी वाढून ३५,३८५ रुपयांवर पोहोचली.
रुपया तळात
डॉलरच्या तुलनेत रुपया गुरुवारी एकदम २२ पैशांनी घसरल्याने स्थानिक चलन २९ महिन्यांच्या नव्या तळात विसावले. रुपयाचा बंद स्तर ६८.०५ असा राहिला.