आंतरराष्ट्रीय स्तरावरील भू-राजकीय अस्थिरतेने स्थानिक भांडवली बाजारात धडकी निर्माण केली. परिणामी मुंबई शेअर बाजार शुक्रवार या सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी महिन्याभराच्या तळाला आला. तब्बल २५९.८७ अंशांनी घसरत २५,५०० चा स्तर सोडत सेन्सेक्स २५,३२९.१४ पर्यंत खाली आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीनेही शुक्रवारी ७,६०० ची पातळी सोडली आणि हा निर्देशांकही ८०.७० अंश घसरणीने ७,५६८.५५ वर स्थिरावला.
आठवडय़ाच्या शेवटच्या व्यवहाराची सुरुवात  सेन्सेक्सने १८० अंशांनी घसरणीने केली. दिवसभरात त्याची गटांगळी गुरुवारच्या तुलनेत थेट ३५० अंशांपर्यंत गेली. यामुळे सेन्सेक्स २५,२३२.८२ नीचांकापर्यंत खाली आला. सेन्सेक्सचा हा नीचांकी सूर दिवसअखेरही कायम राहिला.
आंतरराष्ट्रीय बाजारात आशियातील प्रमुख निर्देशांक २ टक्क्यांपर्यंत घसरत होते, तर युरोपातील बाजारातही सुरुवातीची एक टक्क्यांपर्यंतची घसरण होती. तर गेल्या दोन व्यवहारातील मिळून मुंबई निर्देशांकांची घसरण ३१९ अंशांची राहिली आहे, तर शुक्रवारची आपटी ही १५ जुलैनंतरची सर्वात मोठी आपटी नोंदली गेली आहे. सलग तिसऱ्या दिवसातील घसरणीमुळे सेन्सेक्सचे ५७८.८७ अंश नुकसान झाले आहे.
मुंबई शेअर बाजारातील १२ पैकी १० क्षेत्रीय निर्देशांक घसरणीत राहिले. यामध्ये बांधकाम, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू, बँक, वाहन या निर्देशांकांमध्ये मोठी आपटी नोंदविली गेली, तर सेन्सेक्समधील २४ कंपनी समभागांचे मूल्य घसरले. टाटा पावर, भेल, टाटा स्टील, गेल इंडिया, हिंदाल्को, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, अ‍ॅक्सिस बँक असे प्रमुख निर्देशांक घसरले. नफ्यातील वाढीचे वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या स्टेट बँकेचे समभाग मूल्यही एक टक्क्याने आपटले.

*सलग तीन दिवसात सेन्सेक्सचे ५७८.८७ अंशांनी नुकसान
*प्रमुख आशियाई बाजाराच्या निर्देशांकात शुक्रवारी दोन टक्क्यांपर्यंत घसरण    
    

Story img Loader