भांडवली बाजारातील तेजीने सप्ताहअखेर नवेच चित्र उमटवले. निर्देशांकाचा यापूर्वीचा विक्रम मागे सारत सेन्सेक्सने २५,५०० नजीकची वाटचाल शुक्रवारी अनुभवली. त्याला योग्य साथ देणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील ७५००च्या पुढे गेला. मुंबई निर्देशांकाने तर गेल्या तीन सप्ताहांतील सर्वोच्च झेप नोंदविली.
विक्रमाला मागे टाकण्याची प्रक्रिया पार पाडणारा सेन्सेक्स आठवडय़ातील शेवटच्या दिवसाचे व्यवहार सुरू होताच २५ हजारांच्या पुढे जाताना गुरुवारच्या तुलनेत २०० हून अधिक अंशांची भर नोंदवीत होता. सत्राच्या अखेरच्या टप्प्यात २५,४१९.१४ पर्यंत झेपावण्यापूर्वी त्याने २५,१२९.७६ हा दिवसाचा तळ गाठला. मात्र दिवसभर त्याचा प्रवास २५ हजारापुढेच होता.
मे महिन्यात दोन वेळा व्यवहारादरम्यान २५ हजाराला स्पर्श करणाऱ्या सेन्सेक्सने गुरुवारी प्रथमच बंदअखेर हा टप्पा पार केला होता. शुक्रवारी सुरुवातीपासूनच त्यापुढे वाटचाल करणाऱ्या मुंबई निर्देशांकाने बंदअखेर दीड टक्के वधारणेसह १६ मेच्या व्यवहारातील २५,३७५.६३ तर बंदचा गुरुवारचा २५,०१९.५१ हे दोन्ही टप्पे मागे टाकले. तर त्याची एकाच व्यवहारातील तब्बल ३७६.९५ ही झेप गेल्या तीन आठवडय़ांतील सर्वात मोठी ठरली. सेन्सेक्सने व्यवहारातील त्याच्या तीन आठवडय़ांतील उच्चांकासह गुरुवारचा त्याचा बंद टप्पाही चालू सप्ताहअखेरच्या एकाच दिवसात मोडीत काढला आहे. जूनच्या पहिल्या आठवडय़ातील सेन्सेक्सची झेप जवळपास पाच टक्क्यांची राहिली आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकानेही शुक्रवारी ७५०० पर्यंत जाताना शतकी वधारणेसह नवा उच्चांक नोंदविला. निफ्टी सत्रा दरम्यान ७५९२.७० पर्यंत झेपावला. भाजपप्रणीत लोकशाही आघाडी सरकारला संसदेत बहुमत मिळाल्याचे जाहीर झाले, तेव्हा १६ मे रोजी निफ्टी व्यवहारात ७५६३.५० या सर्वोच्च टप्प्यावर गेला होता. तर बंदअखेर त्याचा यापूर्वीचा वरचा स्तर ७५६३.५० नोंदला गेला आहे.
नरेंद्र मोदी सरकारचा येत्या महिन्यात येऊ घातलेला पहिला अर्थसंकल्प विकासाला व गुंतवणुकीला चालना देणारा असेल, या आशेवर विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा भांडवली बाजारावरील खरेदीचा दबाव वाढला. कृषीसह उत्पादन क्षेत्राला हातभार ठरू पाहणारा मान्सूनही दक्षिण देशाच्या दाराजवळ येऊन ठेपल्याने गुंतवणूकदारांना हायसेच झाले. युरोपीय मध्यवर्ती बँकेने गुरुवारी उशिरा जारी केलेल्या आर्थिक उपायांमुळे भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये विदेशी निधीचा ओघ वाढू लागेल, यालाही बळकटी मिळाली. युरोपातील कॅक, डॅक्स, एफटीएसईदेखील एक टक्क्यापर्यंत वधारले.
सलग दुसऱ्या दिवशी समभागांची जोरदार खरेदी नोंदविताना गुंतवणूकदारांनी बांधकाम, तेल व वायू, बँक क्षेत्राला पसंती दिली. १२ पैकी ९ क्षेत्रीय निर्देशांक वधारणेत राहिले.
तब्बल ५ टक्क्यांसह बांधकाम निर्देशांक वरचढ राहिला. स्मॉल व मिड कॅप निर्देशांकही टक्केवारीत सेन्सेक्स इतकेच वधारले होते. सेन्सेक्समधील २४ कंपनी समभागांचे मूल्य उंचावले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील टीसीएस, इन्फोसिससह सेसा स्टरलाईट, हिंदाल्को, भारती एअरटेल, कोल इंडियामध्ये घसरण नोंदली गेली.
वायू दरवाढीच्या अपेक्षित निर्णयावर समभाग झळाळले
तेजीतील क्षेत्रीय निर्देशांकामध्ये ४.८२ टक्के वधारणेसह दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या तेल व वायू क्षेत्रातील कंपनी समभागांचे मूल्य शुक्रवारी एकदमच झळाळले. मोदी सरकार नैसर्गिक वायू दरवाढीचा निर्णय येत्या १ जुलैपासून लागू करतील, या अटकळीवर सर्वाधिक फलदायी रिलायन्ससह सार्वजनिक क्षेत्रातील गेल इंडिया, ओएनजीसी यांचे समभाग उंचावले. ओएनजीसी तर वर्षभरातील उच्चांकासह ११ टक्के वाढ राखता झाला.
७५० समभागांना वार्षिक उच्चांकी मूल्य
अवघ्या काही सत्रांमध्येच नवनवे विक्रम रचणाऱ्या मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी तब्बल ७५० कंपनी समभाग त्याच्या वर्षभरातील उच्चांकी मूल्याला पोहोचले. यामध्ये अॅक्सिस बँक, भारत पेट्रोलियम, डीएलएफ, एचपीसीएल, एनएमडीसी, एनटीपीसी, रिलायन्स पॉवर, सेल, स्ट्राईड्स अॅर्कोलॅब, टाटा पॉवर, टाटा स्टील, युको बँक, युनिटेक, व्होल्टास यांचा समावेश राहिला.
रुपयाचा पंधरवडय़ातील उत्तम प्रवास
डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन पुन्हा भक्कम होताना सप्ताहअखेर गेल्या पंधरवडय़ातील उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. रुपयात शुक्रवारी घसघशीत १६ पैशांची वाढ होत चलन ५९.१७ पर्यंत गेले. विक्रमातील भांडवली बाजारात निधीची गरज चलनाला भक्कम करत गेली. यापूर्वी ुव्यवहारातील सर्वात मोठी, ३० पैसे भर २२ मे रोजी पडली होती.
तेजीचा वारू अधिकच उधळला!
भांडवली बाजारातील तेजीने सप्ताहअखेर नवेच चित्र उमटवले. निर्देशांकाचा यापूर्वीचा विक्रम मागे सारत सेन्सेक्सने २५,५०० नजीकची वाटचाल शुक्रवारी अनुभवली.
First published on: 07-06-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex nifty hit new record highs as dream run continues