सलग दुसऱ्या दिवशी भांडवली बाजारात तेजी नोंदविण्यास पुन्हा एकदा सरकारचे निमित्त ठरले. वस्तू व सेवा कराला (जीएसटी) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीने ४१६.४४ अंशांची झेप नोंदविण्यास भाग पडलेला मुंबई शेअर बाजार सप्ताहअखेर मध्य वार्षिक आर्थिक आढाव्यातील वाढीव विकास दराच्या (जीडीपी) अंदाजावर २४५.२७ अंशांची वाढ राखणारा ठरला. सेन्सेक्स आता २७,३७१.८४ पर्यंत पोहोचला आहे. तर ६५.९० अंश वाढीने निफ्टी ८,२२५.२० वर बंद झाला.
गुरुवारप्रमाणेच मुंबई शेअर बाजारातील शुक्रवारची तेजी सुरुवातीपासूनच कायम होती. २७,२९२.५५ ने सुरुवात करणारा सेन्सेक्स व्यवहारात २७,५०० नजीक पोहोचला. दिवसअखेरही तो जवळपास दिवसाच्या वरच्या टप्प्यावरच स्थिरावला. निफ्टीचा प्रवासही दिवसभरात ८,२६३.४५ ते ८,२०८.६० असा राहिला.
सेन्सेक्समधील ३० पैकी २१ समभाग तेजीत राहिले. हिंदाल्को, आयसीआयसीआय बँक, टाटा पॉवर, सेसा स्टरलाईट, विप्रो, टीसीएस, कोल इंडिया, लार्सन अॅन्ड टुब्रो, एनटीपीसी, डॉ. रेड्डीज्, इन्फोसिस, एचडीएफसी, टाटा स्टील, ओएनजीसी, महिंद्र अॅन्ड महिंद्र, टाटा मोटर्स यांचे मूल्य ०.२० ते २.९५ टक्क्य़ांपर्यंत उंचावले.
क्षेत्रीय निर्देशांकात माहिती तंत्रज्ञान सर्वाधिक १.९५ टक्क्य़ांसह वाढला. पाठोपाठ पोदला, तेल व वायू, भांडवली वस्तू, ऊर्जा, बँक निर्देशांकांची वाढीची कामगिरी राहिली. स्मॉल कॅप ०.५७ टक्के तर मिड कॅप ०.३६ टक्क्य़ासह उंचावला. आशियायी बाजारीतील तेजीचीदेखील येथील भांडवली बाजाराला साथ मिळाली. तेथील निर्देशांक १.११ ते २.३९ टक्क्य़ांनी वाढले होते. परिणामी सेन्सेक्सला सप्ताह उंचीवर स्थिरावता आले.
रुपया पुन्हा घसरला
मुंबई : डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन पुन्हा डळमळीत झाले. १९ पैशांनी घसरत सप्ताहअखेर रुपया ६३.३० पर्यंत आला. चालू आठवडय़ातच रुपयाने ६३.५३ असा गेल्या १३ महिन्यांचा तळ अनुभवला आहे. गुरुवार वगळता आठवडय़ातील सुरुवातीच्या सलग तीन व्यवहारातील घसरणीमुळे रुपया १३२ पैशांनी घसरला होता. गुरुवारी मात्र त्यात अर्धशतकी पैशांची भर पडली.
रुपयात गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात अवमूल्यन होत आहे. मात्र त्याबाबत फार चिंताजनक परिस्थिती आहे, असे वाटत नाही. थोडय़ा अस्थिरतेनंतर चलन निश्चितच पूर्वपदावर येईल. एकूणच विकसित राष्ट्रांना त्यांच्या चलन नरमाईचे आव्हान भेडसावत आहे. डॉलरसमोर हे सारे कमकुवत ठरत असले तरी आशियाई चलनांच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण ही किमान आहे.
– अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री.