सलग तिसऱ्या दिवसात तेजीची घोडदौड कायम राखत, सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी शुक्रवारी पुन्हा नव्या विक्रमी कळसाला गवसणी घातली. येत्या मंगळवारच्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियोजित द्वैमासिक आढावा बैठकीत व्याजदर कपातीचा निर्णय येईल ही आशा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरातील नरमाईच्या दिलाशाने बाजारातील गुंतवणूकदारांचा उत्साह द्विगुणित केला. परिणामी सेन्सेक्सने गुरुवारच्या तुलनेत २५५.०८ अंशांची कमाई करून २८,६९३.९९ ला तर निफ्टीने ९४.०५ अंश कमावून ८,५८८.२५ या अभूतपूर्व कळसाला गाठण्याचा विक्रम दिवसअखेर केला.
भारताकडून देशांतर्गत इंधनाची गरज ८० टक्के आयातीद्वारे भागवावी लागत असताना, कच्चे तेलाचे आयात दर हे प्रति पिंप ७२ डॉलर असे साडेचार वर्षांपूर्वीच्या नीचांकापर्यंत घसरणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने निश्चितच स्वागतार्ह बाब असून, तिचे शुक्रवारी बाजारात सकारात्मक प्रतिबिंब उमटले. चालू खात्यावरील चिंताजनक वाढलेली तूट झपाटय़ाने कमी करण्यासाठी मदतकारक ठरलेली ही कच्च्या तेलातील नरमाईने, बाजारात तेल विपणन कंपन्या, हवाई वाहतूक कंपन्या, रंग निर्मात्या कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांचे खरेदीचे स्वारस्य दिसून आले.
त्याचप्रमाणे व्याजदर कपातीबाबत आशावाद तसेच सरकारी बँकांतील हिस्सा ५२ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे सरकारकडून आलेल्या संकेतांनी, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागांनाही बाजारात मोठी मागणी दिसून आली. बँकांप्रमाणे व्याजदराबाबत संवेदनशील असलेल्या वाहन निर्मात्या, स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांचे भावही लक्षणीय वधारलेले दिसून आले. रिझव्‍‌र्ह बँकेने छोटय़ा व देयक बँकांच्या परवाने प्राप्तीसाठी अंतिम दिशानिर्देश गुरुवारी सायंकाळी जारी केल्याच्या परिणामी निवडक बिगरबँकिंग वित्तीय कंपन्यांच्या समभागांनाही मागणी दिसून आली.
गेल्या तीन दिवसांच्या निरंतर तेजीतून सेन्सेक्सने ३५५ अंश कमावले आहेत. बाजारातील एक गुंतवणूकदारांची मालमत्ता म्हणजे मुंबई शेअर बाजारात (बीएसईवर) सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवलाने १०० लाख कोटी रुपयांच्या अनोख्या टप्प्याला शुक्रवारी सकाळी ३०० अंशांच्या उसळीसरशी गाठले. दिवसअखेर मात्र ते किंचित खाली ९९,८१,५५० कोटी रुपये या पातळीवर स्थिरावले, तरी दिवसभरात बाजार भांडवलात ८७,५५० कोटी रुपयांची नव्याने भर पडली.

तेल उत्पादक राष्ट्रांची संघटना ‘ओपेक’ने उत्पादन स्तरात फेरबदल न करण्याचा घेतलेला निर्णय हा कच्च्या तेलातील किमतीतील घसरणीचा उत्साहात भर घालत तो दुणावणारा ठरला. रिझव्‍‌र्ह बँकेकडून व्याज दर कपातीबाबत बाजाराला मोठय़ा अपेक्षा असल्याचे एकंदर उत्साह पाहता स्पष्ट होते.
दीपेन शाह, कोटक सिक्युरिटीज

रिझव्‍‌र्ह बँकेकडून संभाव्य व्याजदर कपातीबाबत बळावलेल्या आशावादात, कच्चे तेल प्रति पिंप ७२ डॉलपर्यंतची घसरणीने आणखी बळकट बनविण्याचे काम केले. उत्पादन कपात न करण्याच्या ‘ओपेक’चा निर्णय पाहता तेलाच्या किमतीतील घसरण सुरू राहण्याचे संकेत आहेत. त्यामुळे २ डिसेंबरला नाही झाली तरी व्याजदर कपात लवकरच होईल ही शक्यता कुणीही नाकारू शकणार नाही. या सर्व बाबी बँका, वाहन, स्थावर मालमत्ता समभागांना नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या निश्चितच आहेत.
विनोद नायर,

जिओजित बीएनपी परिबा फायनान्शियल झेप.. १०० लाख कोटींची
गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत दसपटीने वाढ
मुंबई: भांडवली बाजारात निर्देशांकांनी अभूतपूर्व शिखर दाखविले इतकेच नव्हे, तर शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराच्या बाजार भांडवलाने १०० लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीला गवसणी घातली. १० लाख कोटी ते १०० लाख कोटी हा दसपट वाढीचा प्रवास दशकभरात पूर्ण करण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी १०.०५ वाजता बीएसई सेन्सेक्स निर्देशांक ३०० अंशांनी उसळला आणि या बाजारातील गुंतवणूक गंगाजळीने १००.०१ लाख कोटींची अभूतपूर्व पातळी गाठली. उल्लेखनीय म्हणजे यातील शेवटच्या चार पायऱ्या म्हणजे ७० लाख कोटी ते १०० लाख कोटींचा प्रवास हा चालू वर्षांत मे पासून सात महिन्यांत म्हणजे केंद्रात मोदी सरकारच्या हाती कारभार आल्यापासून पूर्ण करण्यात आला आहे.