केंद्रीय अर्थसंकल्पाने हुरळून गेलेला भांडवली बाजार अद्यापही त्या वातावरणातून बाहेर पडू पाहत नाही. सोमवारी जवळपास शतकी वधारणेसह सेन्सेक्स २९,५०० नजीक पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने सप्ताहारंभीच नवा उच्चांक गाठला.
तेजीसह नव्या महिन्यातील व्यवहारांची सुरुवात करताना प्रमुख निर्देशांक दिवसभर तेजीत होते. दिवसअखेर सेन्सेक्स ९७.६४ अंश वाढीसह २९,४५९.१४ वर बंद झाला. सत्रात २९,२५९.७७ पर्यंत घसरणाऱ्या मुंबई निर्देशांकाने व्यवहारात २९,५७६.३२ या वरचा टप्पा गाठला.
Untitled-1
अर्धशतकी तेजीची खेळी खेळणाऱ्या देशातील सर्वात मोठय़ा बाजाराने सोमवारी ८,९५६.७५ या ऐतिहासिक स्तर पादाक्रांत केला. निफ्टीचा यापूर्वीचा सर्वोच्च टप्पा महिन्याभरापूवी, २९ जानेवारी रोजी ८,९५२.३५ होता.
सलग तिसऱ्या व्यवहारात निर्देशांकांनी वाढ राखली आहे. शनिवारी, अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी सत्रात ६०० अंशांची आपटी नोंदणाऱ्या सेन्सेक्सने सप्ताहअखेर जवळपास दीडशे अंशांची वाढ नोंदविली होती. सोमवारची त्याची सुरुवातही २९,५०० पुढील प्रवासानेच झाली.
सोमवारी भांडवली वस्तू व बँक समभागांची खरेदी झाली. तर फेब्रुवारीमधील वाढीव विक्रीच्या जोरावर वाहन कंपनी समभागांनाही मागणी राहिली. आरोग्यनिगा, ऊर्जा क्षेत्रातील समभागांनीही तेजीला साथ दिली.
सत्रात निफ्टी ८,८८५.४५ ते ८,९७२.३५ असा प्रवास करता झाला. तर गेल्या पाच महिन्यातील किमान निर्मिती वाढ नोंदविण्याचा परिणाम सेन्सेक्सवरील कमी वाढीवर नोंदला गेला. सेन्सेक्सने गेल्या तीन व्यवहारात ७१२.४९ ची भर घातली आहे.
सेन्सेक्समधील ३० कंपनी समभागांमध्ये अ‍ॅक्सिस बँक, सिप्ला, भेल, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, हिंदुस्थान यूनिलिव्हर, मारुती सुझुकी, एनटीपीसी हे वधारले. १७ समभागांचा त्यात समावेश होता. तर १३ समभागांचे मूल्य रोडावले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ३.५८ टक्क्य़ांसह भांडवली वस्तू निर्देशांक तेजीत सर्वात आघाडीवर होता.