सलग चौथ्या व्यवहारात तेजी राखणारा सेन्सेक्स आता महिन्याच्या उच्चांकावर पोहोचला आहे. बुधवारच्या ८९.७६ अंश वधारणेसह मुंबई निर्देशांक २०,७२२.९७ या २४ जानेवारीनंतरच्या सर्वात मोठय़ा टप्प्यावर विसावला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीदेखील सप्ताहातील सलग तिसऱ्या व्यवहारात तेजी नोंदविताना २५.६५ अंश वाढीसह ६,१५२.७५ पर्यंत गेला.
गेल्या तीन सत्रांत मिळून ४४१ अंशांची वाढ नोंदविणाऱ्या सेन्सेक्समध्ये बुधवारी पुन्हा भर पडल्याने ती तब्बल ५३० अंशांहून अधिक झाली आहे. असे करताना सेन्सेक्स महिन्याच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला आहे. यापूर्वी २४ जानेवारीला शेअर बाजार २१,१३३.५६ वर होता. आघाडीच्या कंपन्यांमधील गुंतवणूकदारांची खरेदी कायम आहे. बुधवारी बाजारात माहिती तंत्रज्ञानसह औषधनिर्माण क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना अधिक मागणी राहिली. सन फार्मा, डॉ. रेड्डीज लेबॉरेटरी, रॅनबॅक्सीचा समभाग ३ टक्क्यांपर्यंत उंचावला होता. सेन्सेक्समध्ये केवळ टाटा मोटर्स हा स्थिर राहिला. तर १६ कंपनी समभागांचे मूल्य उंचावले व १३ चे घसरले. माहिती तंत्रज्ञान निर्देशांक सर्वाधिक १.४ टक्क्यांसह वधारला. माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण या क्षेत्रीय निर्देशांकासह स्मॉल व मिड कॅपमध्येही विदेशी भांडवली ओघ दिसून आला. परिणामी सेन्सेक्स व्यवहारात २०,७५०.५२ पर्यंत झेपावला. तर मंगळवारच्या अमेरिकेतील तेजीच्या जोरावर बुधवारी आशियातील बाजारातही प्रमुख निर्देशांकांमध्ये सकारात्मक वातावरण राहिले. युरोपीयन बाजारात मात्र संमिश्र चित्र होते.