एका दिवसाच्या विश्रांतीनंतरच्या व्यवहारात अस्थिरता निर्माण करणाऱ्या भांडवली बाजारांनी सप्ताहाअखेर किरकोळ वाढ राखली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३३.१७ अंश वाढीसह २७,२४१.७८ वर बंद झाला. तर २६.६० अंश वाढीमुळे निफ्टीने पुन्हा एकदा ८,२०० पुढील टप्पा गाठला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा हा प्रमुख निर्देशांक ८,२००.७० वर स्थिरावला.
भांडवली बाजारातील महिन्यातील वायदापूर्तीची अखेर गुरुवारच्या सुटीमुळे बुधवारीच पार पडली होती. जानेवारीतील डेरिव्हेटिव्ह््जमधील व्यवहार निर्देशांकाच्या वाढीने करत मुंबई शेअर बाजार मध्यांतरात काहीसा नरमला. दिवसअखेर मात्र तो बुधवारच्या तुलनेत उंचावला. यापूर्वीच्या दोन व्यवहारांत सेन्सेक्सने ४९३.१८ अंश घसरण नोंदविली आहे. २०१४ मध्ये २४ डिसेंबपर्यंत सेन्सेक्सने गेल्या वर्षीच्या तुलनेत २९ टक्के भर नोंदविली आहे.
बाजारात शुक्रवारी माहिती तंत्रज्ञान, स्थावर मालमत्ता, पोलाद क्षेत्रातील समभागांची खरेदी झाली. तर सेन्सेक्समधील एचडीएफसी, सेसा स्टरलाइट, टीसीएस, इन्फोसिस, हिंदाल्को यांचे समभाग मूल्य वाढले. सेन्सेक्समधील निम्मे समभाग तेजीच्या यादीत राहिले.
चांदी ३७ हजारांपुढे; सोने सप्ताह उंचीवर
वर्षअखेरचे सण – समारंभ आणि लग्नाचा मोसम यामुळे मौल्यवान धातूतील खरेदी पुन्हा वाढू लागली असून शुक्रवारी त्यामुळे सराफा बाजारात सोने तसेच चांदीचे दर मोठय़ा फरकाने वाढलेले दिसले. सोन्याचा तोळ्याचा भाव एकदम ४०० रुपयांनी वाढून २७ हजारानजीक, २६,९१५ रुपयांपर्यंत पोहोचतले. शुद्ध सोन्याने मात्र याच वजनासाठीचा हा टप्पाही पार केला. तर चांदीच्या किलोच्या दरांमध्ये जवळपास १,००० रुपयांची, ९७० रुपयांची वाढ होऊन पांढरा धातू पुन्हा ३७ हजार रुपयांपुढे पोहोचला. चांदीचे दर किलोसाठी ३७,७८० रुपयांवर पोहोचले आहेत.
सलग तिसऱ्या दिवशी रुपयाची ६३.५७ खाली घसरण
डॉलरच्या समोरील रुपयाची कमकुवता सलग तिसऱ्या सत्रातही कायम राहिली असून स्थानिक चलन शुक्रवारी ६ पैशांनी घसरले. रुपया आठवडाअखेर ६३च्याही खालीच राहिला असून सत्रअखेर तो ६३.५७ वर थांबला. बुधवारच्या ६३.५१ नंतर रुपया शुक्रवारच्या व्यवहारात ६३.४५ पर्यंतच झेप घेऊ शकला. तर त्याचा सत्रातील तळ ६३.७० नोंदला गेला. चलन व्यवहार गुरुवारी ख्रिसमसमुळे होऊ शकले नव्हते.
दोलायमान स्थितीनंतर सेन्सेक्सची वाढीने सप्ताहाअखेर
एका दिवसाच्या विश्रांतीनंतरच्या व्यवहारात अस्थिरता निर्माण करणाऱ्या भांडवली बाजारांनी सप्ताहाअखेर किरकोळ वाढ राखली.
First published on: 27-12-2014 at 01:38 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex nifty rangebound after smart rally