चीनमधील आर्थिक स्थितीमुळे सोमवारच्या मोठ्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी चढ-उतार पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९०.८२ अंशांनी वधारून २६०३२.३८ अंशांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७१.७० अंशांनी वाढून ७८८०.७० वर बंद झाला.
मंगळवारी सकाळी बाजार सुरू झाल्यावर त्यामध्ये किंचित सुधारणा झाली. मात्र, थोड्याच वेळात पुन्हा घसरणीला सुरुवात झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४२५ अंशांनी घसरला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १३० अंशांनी घसरला. त्यानंतर दुपारी पुन्हा त्यामध्ये सुधारणा होण्यास सुरुवात झाली आणि अखेर दोन्ही शेअर बाजारांच्या निर्देशांकात वाढ होऊनच ते दिवसभरासाठी बंद झाले. गुतवणूकतज्ज्ञांच्या मते या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात चढ-उताराचा आलेख कायम राहील.
दरम्यान, एकीकडे शेअर बाजारात घसरण होत असताना डॉलरच्या तुलनेत रुपयामध्येही सोमवारी घसरण झाली होती. त्यामध्ये मंगळवारी सुधारणा झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव मंगळवारी सकाळी २६ पैशांनी वधारून तो ६६.३९ पर्यंत जाऊन पोहोचला. निर्यातदार आणि बॅंकांकडून डॉलरची विक्री करण्यात आल्यामुळे जागतिक बाजारपेठेत त्यामध्ये घट झाली. त्याचाच परिणाम भारतातही दिसून आला.
चीनमधील मंदीच्या वातावरणामुळे मुंबई शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण झाली होती. दिवसभर घसरणीचा वेग कायम राहिला आणि दुपारी सेन्सेक्स १६२४ अंशांनी घसरूनच बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातही घसरणीचीच स्थिती होती.
चढ-उतारानंतर निर्देशांकात थोडी सुधारणा
चीनमधील आर्थिक स्थितीमुळे सोमवारच्या मोठ्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात मंगळवारी चढ-उतार पाहायला मिळाली.
First published on: 25-08-2015 at 11:37 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex nifty remain volatile