भांडवली बाजारात अर्थव्यवस्थेतील सुधाराच्या ताज्या संकेतांचे उत्साहवर्धक पडघम सलगपणे घुमत असून, प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने तेजीच्या दौडीचा क्रम बुधवारी सलग नवव्या दिवशी कायम ठेवला. देशांतर्गत सुगीला जगभरातील बाजारांच्या सकारात्मक संकेतांनी आणि विदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदी पाठबळाची जोड मिळाल्याने सेन्सेक्सने १२० अंशांची भर घालत २७,१३९.९४ अशा अभूतपूर्व पातळीवर विश्राम घेतला. निफ्टीनेही ३१.५५ अंशांच्या वाढीसह ८,११४.६० अशी विक्रमी पातळी गाठली. सेन्सेक्सने सलग नऊ दिवसांच्या दौडीत तब्बल ८२५ अंशांची कमाई केली आहे.
युक्रेनच्या पूर्व सीमेवर युद्धबंदीच्या घोषणेसाठी रशिया आणि युक्रेनदरम्यान घडून आलेले सामंजस्य आणि कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये प्रति पिंपासाठी १०० अमेरिकी डॉलरच्या खाली म्हणजे १६ महिन्यांतील नीचांक पातळीवर उतार या गोष्टींनीही स्थानिक बाजाराच्या उत्साहात आणखी भर घातली.     २०१४-१५ च्या एप्रिल ते जून या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाने ५.७ टक्के वाढ नोंदविली आहे. तर देशाने चालू खात्यातील तूटही सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १.७ टक्के अशी राखली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ही तूट ४.८ टक्के होती. भाजपप्रणीत आघाडी सरकारच्या स्थापनेच्या कालावधीत हे सारे घडून आल्याची भावना गुंतवणूकदारांची झाली असून गेल्या दोन दिवसांपासून त्याची प्रतिक्रिया भांडवली बाजारातही उमटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौऱ्याचे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने फलनिष्पत्तीनेही बाजारातील तेजीला इंधन पुरविले आहे.
रुपयाचीही ६०.३३ उच्चांकाला गवसणी
मुंबई:  सलग चार दिवसांच्या घसरणीला विराम देत चलनाने प्रति डॉलर ६०.३३ या महिन्याभरा पूर्वीच्या सशक्तेला बुधवारी गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय भू-राजकीय परिस्थितीतील सकारात्मक बदलाचा परिणाम चलनाच्या सशक्ततेत दिसून आला. बुधवार अखेर प्रति डॉलर १९ पैशांच्या मजबुतीसह ६०.४९ या स्तरावर रुपया स्थिरावला. स्थानिक भांडवली बाजारात निरंतर सुरू असलेल्या तेजीमुळे विदेशातून गुंतवणुकीचा ओघ कायम राहिला असून, त्यानेही रुपयाच्या बळकटीला हातभार लावला.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा