रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणावर तेजीची प्रतिक्रिया देणारा भांडवली बाजार, तीन दिवसांत प्रथमच बुधवारी नकारात्मक प्रवास करते झाले. गुंतवणूकदारांनी नफेखोरी साधत सेन्सेक्समध्ये २४२.७४ अंशांची घसरण नोंदविल्याने, हा निर्देशांक आता २५,६६५.२७ वर येऊन ठेपला आहे, तर ७४.५० अंश घसरणीसह निफ्टी ७,६७२.०५ पर्यंत खाली आला आहे.
पतधोरणाच्या आदल्या व त्याच दिवशी मुंबई शेअर बाजाराने निर्देशांकातील तेजी नोंदविली आहे. या दोन्ही सत्रांत मिळून सेन्सेक्स ४२७.१७ अंशांची भर घालतानाच २६ हजारांनजीक जाऊन पोहोचला होता. तत्पूर्वी नव्या महिन्याची सुरुवात करताना बाजार नरम होता. गेल्या शुक्रवारीही बाजाराने घसरण नोंदविली होती.
त्याचप्रमाणे आधीच्या सलग दोन दिवसांच्या तेजीमुळे निफ्टीतील वाढही १४४ अंश राखली गेली होती. ती बुधवारी मोडीत निघाली. निफ्टी निर्देशांकही आता ७,७०० या मानसिकदृष्टय़ा महत्त्वाच्या पातळीखाली उतरला आहे.
बुधवारच्या सत्रातच बाजाराने घसरणीसह सुरुवात केली. आशियाई बाजारातील घसरणीच्या जोरावर येथेही निरुत्साह निर्माण झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी पुन्हा घेतलेली झेप आणि परकी चलन व्यवहारात रुपया गाठत असलेला पाच महिन्यांचा तळ यामुळे गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचे धोरण अवलंबिले.
सेन्सेक्समधीलआयटीसी, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी, सन फार्मा, सेसा स्टरलाइट, टाटा स्टील, हिंदाल्को असे २३ समभाग घसरले, तर १२ क्षेत्रीय निर्देशांकांपैकी १० घसरणीच्या यादीत नोंदले गेले. वधारत्या डॉलरमुळे माहिती तंत्रज्ञान कंपन्या व संबंधित क्षेत्रीय निर्देशांक वधारता राहिला. तर घसरणीत सर्वात पुढे १.९० टक्क्यांसह माहिती तंत्रज्ञान निर्देशांक राहिला.