सलग चौथ्या सत्रात वाढ नोंदविणारे भांडवली बाजार बुधवारी मोठी उसळी घेत नव्या उच्चांकांवर पोहोचले. येत्या आठवडय़ातील अर्थसंकल्पाच्या स्वागताची बाजारांची तयारी बुधवारी आणखी जोमाने दिसली. ३२४.८६ अंश वधारणेसह सेन्सेक्स २५,८४१.२१ वर बंद झाला, तर निफ्टीनेही ९०.४५ अंश भर राखत ७,७२५.१५ हा स्तर गाठला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी बंदबरोबरच व्यवहारातील सर्वोच्च टप्पेही बुधवारी नोंदविले.
आगामी अर्थसंकल्प हा विकासाला चालना देणारा आणि तुटीवर नियंत्रण असणारा असेल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्याने बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये एकदम उत्साह संचारला. लोकोपयोगी अर्थसंकल्प सादर करण्यापेक्षा आपण काहीसे कठोर निर्णय घेऊ, असे संकेतच त्यांनी या माध्यमातून दिले आहेत. तरीदेखील गुंतवणूकदारांनी या वक्तव्यांचा स्वीकार करत समभागांचे मोठे व्यवहार नोंदविले.
मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प जसा जवळ येत आहे तशी निर्देशांकातील तेजी विस्तारत आहे. या चारही सत्रातील सेन्सेक्सची वाढ ७७८.५४ अंश राहिली आहे. मंगळवारी सेन्सेक्स २५,५०० च्या पुढे होता. २५,६६०.५७ या स्तरावर बुधवारच्या सत्राची सुरुवात करणारा मुंबई निर्देशांक लगेचच २५,६६०.१६ या दिवसाच्या नीचांकावर आला. पुढे दिवसभर तो वधारतच होता. सत्राच्या अखेरच्या टप्प्यात तो २५,८६४.५३ पर्यंत गेला होता.
मुंबईबरोबरच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकानेही व्यवहारातील उच्चांकासह सत्रअखेरचा सर्वोच्च टप्पा बुधवारी पार केला. सत्रात ७,७३२.४० पर्यंत गेलेला निफ्टी दिवसअखेर ७,७२५.१५ वर आला, तर गेल्या चारही सत्रातील त्याची अंश वाढ २३२ ची राहिली आहे. निर्देशांकांच्या अर्थसंकल्पपूर्व तेजीत विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची महत्त्वाची भूमिका मानली जात आहे. प्राथमिक  आकडेवारीनुसार, बुधवारी त्यांनी १,२९०.६८ कोटींची खरेदी केली.
सेन्सेक्समधील सेसा स्टरलाईट, एनटीपीसी, भेल, एचडीएफसी, मारुती सुझुकी, कोल इंडिया, सन फार्मा, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, हिंदाल्को, सिप्ला, आयटीसी यांचे मूल्य ४ टक्क्यांपर्यंत वधारले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद निर्देशांक आघाडीवर राहिला. त्या  पाठोपाठ आरोग्यनिगा, ऊर्जा, भांडवली वस्तू, वाहन, बँक यांचा क्रम राहिला. सर्व १२ क्षेत्रीय निर्देशांक २ टक्क्यांपर्यंत वधारले.

सोने-चांदी दरांची उसंत
*भांडवली व चलन बाजारात तेजीची उसळी असताना सराफा बाजाराने बुधवारी काहीशी उसंत घेतली. सोन्यासह चांदीचेही दर काहीसे नरमले. स्टॅण्डर्ड आणि शुद्ध सोने तोळ्यामागे प्रत्येकी ११५ रुपयांनी कमी झाले. यामुळे १० ग्रॅम सोन्याचा दर २८,०७५ ते २८,२२५ रुपयांवर आला, तर चांदीच्या दरातही किलोमागे ११० रुपयांची घसरण होऊन पांढऱ्या धातूचा भाव मुंबई सराफा बाजार दफ्तरी दिवसअखेर ४५,०७० वर स्थिरावला.
रुपयाची ३८ पैशांनी उसळी
मुंबई : सलग दुसऱ्या सत्रात वधारणेचा प्रवास करणाऱ्या भारतीय चलनाने बुधवारी एकदम ३८ पैशांची उसळी घेतली. गेल्या सात सप्ताहातील सर्वोत्तम झेप रुपयाला दिवसअखेर थेट ६० च्याही वर, ५९.६९ पर्यंत घेऊन गेली. येत्या आठवडय़ात जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पातील तरतुदी देशातील अर्थव्यवस्थेला रुळावर आणणाऱ्या ठरतील, या आशेपोटी रुपया मोठय़ा प्रमाणात वधारला. मंगळवारीही रुपया अमेरिकी चलनापुढे १० पैशांनी भक्कम बनला होता. बुधवारचा त्याचा प्रवास काहीशा नरमाईने सुरू झाला. त्यामुळे त्याने लगचेच ६०.०९ हा दिवसाचा तळही गाठला. रुपया पुन्हा व्यवहारात ५९.६२ पर्यंत उंचावला. रुपयाची बुधवारची ३८ पैसे ही उसळी १६ मेनंतरची सर्वाधिक राहिली. यावेळी चलनाने एकाच व्यवहारात ५० पैशांची वाढ राखली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Sensex nifty surge more than 1 pct to record high
Show comments