गेल्या आठवडय़ात प्रमुख निर्देशांकांचा ऐतिहासिक उच्चांकाचा टप्पा राखणाऱ्या भांडवली बाजारांनी नव्या सप्ताहातदेखील हीच कामगिरी बजाविली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सव्वाशेहून अधिक अंशांची वाढ नोंदवीत २८,२०० पर्यंत जाऊन पोहोचला. तर निफ्टीतही जवळपास अर्धशतकी अंशभर पडल्याने निर्देशांक ८,४५० नजीक पोहोचला आहे.
सोमवारी सेन्सेक्समध्ये १३१.२२ अंश वाढ होऊन निर्देशांक २८,१७७.८८ वर पोहोचला. निफ्टीत दिवसअखेर ४०.८५ अंश भर पडून राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक ८,४३०.७५ पर्यंत गेला. दोन्ही प्रमुख निर्देशांक नव्या आठवडय़ात नव्या टप्प्याला पोहोचले आहेत.
सोमवारी खरे तर ऑक्टोबरमधील वाढत्या व्यापारी तुटीचे आकडे जाहिर झाले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी स्पष्ट झालेल्या घसरलेल्या घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दरादरम्यानचाच प्रतिसाद भांडवली बाजारात सप्ताहाच्या पहिल्या दिवशीदेखील नोंदविला. त्याचबरोबर स्टेट बँक, टाटा मोटर्ससारख्या कंपन्यांनी मिळविलेल्या दुसऱ्या तिमाहीतील वित्तीय निष्कर्षांतील यशही संबंधित कंपनी समभागांसह एकूणच भांडवली बाजाराला वाढ नोंदविण्यास कारणीभूत ठरले.
मुंबई शेअर बाजाराने सोमवारच्या सत्राची सुरुवात काहीशी घसरणीने केली होती. या वेळी तो २८ हजारांपासून आणखी दुरावला. २७,९२१.३४ या त्याचा या प्रसंगीचा तळ मात्र दिवसाचाच ठरला. यानंतर मात्र बाजाराने मागे वळून पाहिलेच नाही. २८ हजारांवर जाताना त्याने २८,२०५.७१ हा दिवसासह उच्चांक गाठतानाच यापूर्वीचे सर्व स्तर मागे टाकले. सेन्सेक्सने १२ नोव्हेंबर रोजी २८,१२६.४८ हा व्यवहारातील सर्वोच्च टप्पा यापूर्वी नोंदविला आहे. तर बंदअखेरचा २८,०४६.६६ हा त्याचा सार्वकालिक स्तर १४ नोव्हेंबर रोजी नोंदला गेला आहे.
मुंबई शेअर बाजारात सोमवारी बँक, ऊर्जा, भांडवली वस्तू क्षेत्रातील समभागांना अधिक भाव मिळाला. सेन्सेक्समधील ३० पैकी १८ समभागांचे मूल्य वधारले. तर १२ समभागांमध्ये घसरण नोंदली गेली. देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेचा समभाग ५.४ टक्क्यांनी वधारून २,९४०.१५ या गेल्या वर्षभराच्या उच्चांकावर पोहोचला.
त्याचबरोबर टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, भेल, भारती एअरटेल यांचेही समभाग मूल्य ४.०७ टक्क्यांपर्यंत वधारले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये १.५४ टक्क्यांसह ऊर्जा निर्देशांक आघाडीवर होता.
जपानची अर्थव्यवस्था आर्थिक मंदीच्या फेऱ्यात अडकलेली पाहून आशियाई बाजारात निराशेचे वातावरण होते. येथे सत्रात ८,४०० च्या खाली येणाऱ्या निफ्टीनेही काहीशी चिंता निर्माण केली होती. मात्र व्यवहारात ८,४३८.१० पर्यंत वधारल्यानंतर निफ्टी ८,४०० च्या पुढे कायम राहण्यात यशस्वी झाला.
निफ्टीचा यापूर्वीचा बंद उच्चांक १४ नोव्हेंबर रोजी ८,३८९.९० हा होता. तर सत्रातील त्याची सर्वोच्च पातळी १२ नोव्हेंबरला ८,४१५.०५ ही होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताची ऑक्टोबरमधील व्यापार तूट विस्तारूनदेखील भांडवली बाजार नव्या उच्चांकावर विराजमान झालेले सोमवारी पाहायला मिळाले. जागतिक तुलनेत भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास खूपच सकारात्मक आहे.  गुंतवणूकदारांचा निधी येत्या डिसेंबपर्यंत सेन्सेक्सला २९ हजार तर निफ्टीला ८,७०० पर्यंत घेऊन जाऊ शकेल.
राजशेखर गोवडा, वरिष्ठ विश्लेषक, एचबीजे कॅपिटल.

भांडवली बाजारांचा सुरुवातीचा प्रवास काहीसा नकारात्मक होता. मात्र शेवटच्या ९० मिनिटांमध्ये तर तो अचानक मोठय़ा प्रमाणात वाढला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापासून विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना मोठय़ा अपेक्षा आहेत. तेव्हा येत्या दोन आठवडय़ात बाजारातील चित्र उंचावलेले कायम राहू शकेल.
राकेश गोयल,वरिष्ठ उपाध्यक्ष,बोनान्झा पोर्टफोलियो.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex nifty touches new levels
Show comments