मंगळवारच्या पतधोरण आढाव्यात रिझव्र्ह बँकेने जरी व्याजाचे दर जैसे थे ठेवले असले तरी ऑगस्टमधील आगामी बैठकीत मात्र व्याजाचे दर कमी केले जाण्याच्या केवळ संकेतांनी भांडवली बाजारात ‘सेन्सेक्स’ २७ हजारांच्या भावनिकदृष्टय़ा महत्त्वाच्या टप्प्यापुढे जाण्याइतका उत्साह पुरवला. मंगळवारच्या २३२ अंशांच्या मुसंडीने सेन्सेक्स आता सात महिन्यांपूर्वीच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे.
जगाच्या अन्य भागांत प्रमुख भांडवली बाजारांमध्ये तेजीने मंगळवारच्या सेन्सेक्सच्या मुसंडीला इंधन पुरविले. तथापि, व्याजदराबाबत संवेदनशील बँकिंग व स्थावर मालमत्ता समभागांमध्ये दिसलेली झळाळी ही रिझव्र्ह बँकेच्या पतधोरणांत आगामी काळात व्याजदरात कपातीबाबत बाजाराच्या आशा तगलेल्या स्पष्टपणे दर्शवितात. रेपो दर ६.५ टक्के पातळीवर स्थिर राखणाऱ्या पतधोरणानंतरही, स्टेट बँक आणि आयसीआयसीआय या दोन बडय़ा बँकांच्या समभागांनी अनुक्रमे ५.४ टक्के आणि ४.३१ टक्क्यांइतकी मोठी झेप घेतल्याचे दिसून आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर, हँगसेंग – हाँगकाँग (१.४२ टक्के), निक्केई – जपान (०.५८ टक्के) या निर्देशांकातील तेजी बाजाराला प्रारंभिक बळ देणारी ठरली.
विदेशी वित्तसंस्थांकडून बाजारात सुरू असलेला गुंतवणुकीचा ओघ पाहता अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातही निरंतर मजबुती येत आहे. मंगळवारच्या रुपयाने डॉलरच्या तुलनेत २० पैशांची दमदार ६६.७७ हा तीन सप्ताहांपूर्वीचा स्तर कमावला. रुपयाच्या या बळकटीनेही बाजारावर सकारात्मक परिणाम साधला.
सेन्सेक्स दिवसअखेर २७,००९.६७ अंशांवर स्थिरावला. सात महिन्यांपूर्वी म्हणजे गतवर्षी २८ ऑक्टोबरला सेन्सेक्सने ही पातळी गमावली होती, ती मंगळवारच्या तेजीतून पुन्हा कमावली. निफ्टी निर्देशांकाने ८,२५० ही तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वपूर्ण पातळी ओलांडून, ८,२६६.४५ अंश म्हणजे सोमवारच्या तुलनेत ६५.४० अंशांची कमाई करणारी मजल मारली.
‘फेड’कडून अनुसरण!
रिझव्र्ह बँकेच्या दर-स्थिरतेच्या धोरणाचे अनुसरण, अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्र्हकडून झाले. फेडच्या प्रमुख जॅनेट येलेन यांनी जोवर अमेरिकी अर्थव्यवस्थेत सुदृढता सुस्पष्टपणे दिसून येत नाही, तोवर मध्यवर्ती बँक अल्पावधीचे व्याजाचे दर आणि आपला दृष्टिकोनही बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे विधान केले. फेडकडून तूर्तास व्याजदर वाढणार नसल्याचे भाष्यही आपल्या शेअर बाजाराचा उत्साह दुणावणारे ठरले.