सलग आठव्या दिवशी तेजी नोंदवत मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने विद्यमान २०१५ वर्षांतील सर्वात मोठी विजय-मालिका नोंदविली. मंगळवारचे बाजारातील व्यवहार संपले तेव्हा ७४.१६ अंशांच्या कमाईसह सेन्सेक्स २७,८०४.३७ अंशांवर स्थिरावला. मान्सूनची प्रगतीने सुखावलेल्या बाजाराला, जागतिक स्तरातून विदेशी गुंतवणुकीच्या ओघाचीही जोड सुरू झाल्याचे दिसून आले.
गेल्या सलग आठ दिवस सुरू राहिलेल्या तेजीतून सेन्सेक्सने एकूण १,४३३ अंशांची भर घातली आहे. अमेरिका दौऱ्यावर असलेल्या अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या आश्वासक विधानांनी, गेल्या काही दिवसात पाठ फिरविलेल्या विदेशी गुंतवणूकदार संस्थांची पावले परत स्थानिक बाजारपेठेकडे वळून, त्यांनी खरेदीला लावलेला हातभार मंगळवारच्या बाजारातील उलाढालीचे वैशिष्टय़ ठरले.
सोमवारीही (काल) विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात ६५१.३१ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली होती.
निफ्टी निर्देशांकानेही मंगळवारच्या व्यवहारात तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वाचा स्तर सांभाळत, त्यात आणखी २८.४५ अंशांची भर घातली. दिवसअखेर निफ्टी ८,३८१.५५ या पातळीवर स्थिरावला.

Story img Loader