२०१६चा पहिला ‘काळा सोमवार’ * १०० कोटींच्या बाजारमूल्यात घट * गुंतवणूकदारांना दीड लाख कोटींचा फटका
शेजारी देशाच्या २०१६च्या क्षितिजावर उगवलेल्या अर्थमंदीच्या निर्देशांक पडझडीचे किरण सोमवारी येथील भांडवली बाजारावरही पडले. प्रमुख चिनी निर्देशांक ७ टक्क्य़ांनी आपटल्यानंतर दोन तासांतच बंद झालेल्या बाजारातील व्यवहाराने मुंबई शेअर बाजारालाही नव्या वर्षांतील पहिला ‘काळा सोमवार’ दाखवला. एकाच व्यवहारात तब्बल ५०० हून अधिक अंशांनी आपटलेला सेन्सेक्स अखेर सप्ताहारंभीच २५,६०० नजीक आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही त्याचा केवळ ७९००च नव्हे तर ७८००चाही स्तर सप्ताहारंभी सोडला. वर्षांरंभीच चिनी पडझडीचे पडसाद अर्थक्षेत्रासाठी धोक्याची घंटा बनून आले आहेत.
अर्थव्यवस्थेच्या प्रगतीची एक मोजपट्टी असलेला चिनी खरेदी निर्देशांक (पीएमआय) ५० टक्क्य़ांखाली गेल्याने चीनच्या भांडवली बाजारातील इतर प्रमुख निर्देशांकांची ७ टक्क्य़ांपर्यंत घसरण झाली. त्यामुळे शांघाय तसेच शेनझेन निर्देशांक दोन तासांतच ठप्प झाले. बाजारातील व्यवहार अशा प्रकारे मोठय़ा नकारात्मक स्थितीत पोहोचल्यानंतर भारतातही त्याचे सावट दिसले. नफेखोरीमुळे सुरुवातीलाच २६ हजारावर गेलेला मुंबई निर्देशांक सोमवारी अखेर २५,६०० पर्यंत खाली आला. चिनी संकटाच्या सावटाबरोबरच भारतातील डिसेंबर २०१५ मधील अडीच वर्षांतील निर्मिती क्षेत्राची सुमार कामगिरी, डॉलरच्या तुलनेतील रुपयाची ५० पैशापर्यंतची घसरगुंडी हेही पडझडीस कारणीभूत ठरले.
नक्की काय झाले?
प्रमुख निर्देशांक आता त्यांच्या गेल्या तीन महिन्यांच्या तळात येऊन पोहोचले आहेत. गेल्या सलग दोन व्यवहारात तेजी नोंदविणारा मुंबई शेअर बाजार आता २२ सप्टेंबर २०१५ च्या समकक्ष येऊन ठेपला आहे. तर सोमवारची निफ्टीची ही एकाच व्यवहारातील १ सप्टेंबर २०१५ नंतरची सर्वाधिक मोठी घसरण ठरली आहे.
२०१६च्या दुसऱ्या व्यवहारातच अस्वस्थ झालेल्या मुंबई शेअर बाजाराने त्याचा गेल्या वर्षअखेर कमाविलेला १०० लाख कोटी रुपयांचा बाजारमूल्याचा टप्पाही खाली आणला. तर एकाच व्यवहारातील निर्देशांकाच्या तणावपूर्ण कामगिरीमुळे गुंतवणूकदारांना सोमवारी १.५४ लाख कोटी रुपयांचा जोरदार फटका बसला.
आपल्यावर परिणाम काय?
जागतिक घडामोडींचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत नाही हे अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्ह बँकेच्या व्याजदर वाढीतून स्पष्ट झालेले ताजे उदाहरण असले तरी चिनी पडझडीमुळे शेजारच्या देशाबरोबर, विशेषत: निर्यातीबाबतच्या भारताच्या संबंधांवर विपरित परिणाम होण्याचे संकट कायम आहे. तसेच चीनमधून होणाऱ्या पोलादासारख्या महत्त्वाच्या आयात वस्तू, विद्युत उपकरण बाजारपेठ येत्या काही कालावधीत मागणी आणि पुरवठय़ाबाबत अस्वस्थता नोंदविण्याची शक्यता आहे.
दोन्ही प्रमुख निर्देशांकातील जवळपास २ टक्क्य़ांहून अधिक झालेली सोमवारची घसरण ही प्रामुख्याने चीनच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे आहे. चिनी अर्थव्यवस्थेशी संबंध येणाऱ्या विशेषत: भारतीय पोलाद उद्योगावर त्यामुळे चिंतेचे मळभ येणे क्रमप्राप्त आहे. अल्प कालावधीसाठी बाजार काहीसे भीतिदायक वातावरण निर्माण करत असले, तरी देशातील भांडवली बाजार दीर्घ कालावधीसाठी अधिक मूल्य कमाविणारे ठरतील.
– जिमीत मोदी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सॅम्को सिक्युरिटीज.