मुंबई: जागतिक भांडवली बाजारातील मंदीच्या प्रवाहाने स्थानिक बाजाराची धूळधाण केल्याचे सोमवारी दिसून आले. गेल्या आठवडय़ात प्रमुख मध्यवर्ती बँकांकडून झालेली व्याजदरातील वाढ आणि त्याच्या प्रभावाने जागतिक मंदीच्या गडद झालेल्या शक्यतेने गुंतवणूकदारांच्या मनांत भीतीने घर केल्याचे सोमवारच्या सलग चौथ्या सत्रातील मोठय़ा घसरणीने प्रत्यय दिला. चार दिवसांच्या पडझडीत समभाग गुंतवणूकदारांना १३.३० लाख कोटींचा फटका सोसावा लागला आहे.
परकीय गुंतवणूकदारांची माघार आणि त्याचा परिणाम म्हणून अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या ऐतिहासिक नीचांकी घसरणीने भांडवली बाजारातील निराशेची छाया आणखी गहिरी बनवली. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या अपवाद केल्यास, सर्वव्यापी समभाग विक्रीच्या लाटांच्या परिणामी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ९५३.७० अंशांनी गडगडून, ५७,१४५.२२ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक – निफ्टीला जेमतेम १७ हजारांची पातळी राखता आली. दिवसअखेरीस हा निर्देशांक ३११.०५ अंशांनी घसरून १७,०१६.३० या पातळीवर बंद झाला. दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये अनुक्रमे १.६४ टक्के आणि १.८० टक्क्यांची घसरण झाली. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकातील घसरण तर यापेक्षा किती तरी मोठी म्हणजेच अनुक्रमे २.८४ टक्के व ३.३३ टक्क्यांची होती. सोमवारच्या बाजारातील व्यवहारांवर मंदीवाले अर्थात विक्री करणाऱ्यांचाच वरचष्मा राहिल्याचे स्पष्ट होते.
आशियात इतरत्र, सोल (कोरिया), टोक्यो (जपान), तर चीनमधील शांघाय आणि हाँगकाँगमधील भांडवली बाजार मोठय़ा पडझडीसह बंद झाले. मध्यान्हीनंतर खुले झालेल्या युरोपातील भांडवली बाजार घसरणीतच व्यवहार करत होते, तर सरलेल्या सप्ताहअखेर अर्थात शुक्रवारी अमेरिकी बाजार नकारात्मक राहिले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय खनिज तेल किमतींचा मानदंड असलेले ब्रेंट क्रूड ०.७५ टक्क्यांनी घसरून िपपामागे ८५.५० डॉलरच्या पातळीवर सोमवारी व्यवहार करीत होते.
‘सेन्सेक्स’ चार सत्रांत २,५७५ अंश लयाला
गत चार सत्रांत सेन्सेक्स-निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकात चार टक्क्यांहून मोठी पडझड झाली आहे. सेन्सेक्स २,५७४.५२ अंशांनी अर्थात ४.३१ टक्क्यांनी घसरला आहे. तर मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल चार सत्रांत १३,३०,७५३.४२ कोटी रुपयांनी घसरून, २,७०,११,४६०.११ कोटी रुपयांवर उतरले आहे. जागतिक अनिश्चितता स्थानिक बाजारातील गुंतवणूकदारांच्या मन:स्थितीवर वर्चस्व गाजवत आहेत.
कितीही किमत मोजावी लागली तरी महागाईला काबूत आणण्याच्या अमेरिकेची मध्यवर्ती बँक – ‘फेड’च्या भूमिकेने दिलेले हे हादरे आहेत. व्याजदरात वाढीतून, जगभरातील रोकडसुलभता शोषून घेण्यासह, डॉलरची किंमत उत्तरोत्तर वाढत चालली आहे. ज्यातून सबंध जागतिक बाजारात अशांतता निर्माण केली गेली आहे.
– विनोद नायर, संशोधन प्रमुख, जिओजित फायनान्शिअल सव्र्हिसेस
जरी रिझव्र्ह बँकेले परकीय भांडवलाच्या माघारीला पायबंद घालण्यासाठी व्याजदर वाढविणे अपरिहार्य असले आणि रुपयाच्या रक्षणार्थ २० टक्के गंगाजळीचा तिने वापर केला असला तरी, सध्याच्या गढूळलेल्या वातावरणात भारताची स्थिती तुलनेने चांगली आहे. त्यामुळे दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदारांनी सध्या पडझडीचा धसका घेण्याचे कारण नाही.
– आलोक जैन, संस्थापक, स्मॉलकेस