तिमाहीत घसरलेल्या चालू खात्यावरील तुटीचे गुरुवारी सकाळच्या सत्रातील स्वागत म्हणून सेन्सेक्सला पुन्हा २७ हजारांवर नेऊन ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांनी सत्रअखेर मात्र नफेखोरी अवलंबत निर्देशांकाला पुन्हा गेल्या आठ महिन्यांच्या तळात आणून सोडले. एकाच व्यवहारात तब्बल ४६९.५२ अंश आपटी नोंदवित सेन्सेक्स २६,५०० च्याही खाली, २६,३७०.९८ वर येऊन थांबला. तर १५९.१० अंश घसरण नोंदविणाऱ्या निफ्टीने गुरुवारी ८,००० चा टप्पाही सोडला. हा निर्देशांक ७,९६५.३५ वर स्थिरावला.
गुरुवारच्या सकाळच्या व्यवहारातच सेन्सेक्सने दीडशेहून अधिक अंशांची उसळी घेतली. यामुळे मुंबई निर्देशांकाला २७ हजारांचा पल्ला पुन्हा गाठता आला. गेल्या आर्थिक वर्षांतील शेवटच्या तिमाहीत चालू खात्यावरील तूट कमी झाल्याचे या वेळी बाजारात स्वागत होत होते. जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांक तेजीत होते. निफ्टीचाही प्रवास या वेळी बुधवारच्या तुलनेत ३१ अंशांनी उंचावत ८,१५० पुढे गेला होता.
मात्र दोन्ही बाजारांत दुपारपूर्वीच निर्देशांकांची पडझड सुरू झाली. वरच्या टप्प्यावर पोहोचलेल्या बाजारात गुंतवणूकदारांची नफेखोरी सुरू झाली. जवळपास ३०० अंशांच्या घसरणीने सेन्सेक्सने याच वेळी २७ हजारांचा टप्पाही सोडला. २६,३५० पर्यंत येऊन तो ठेपला. २७,०१४ च्या वर सेन्सेक्स दिवसभरात जाऊ शकला नाही. तर ‘निफ्टी’चा गुरुवारचा प्रवास ८,१६३ ते ७,९६५ असा घसरता राहिला.
सेन्सेक्समधील वेदांता वगळता इतर सर्व २९ समभाग घसरले.
बाजारात नफेखोरी; निफ्टी ८,००० खाली
तिमाहीत घसरलेल्या चालू खात्यावरील तुटीचे गुरुवारी सकाळच्या सत्रातील स्वागत म्हणून सेन्सेक्सला पुन्हा २७ हजारांवर नेऊन ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांनी सत्रअखेर मात्र नफेखोरी अवलंबत निर्देशांकाला पुन्हा गेल्या आठ महिन्यांच्या तळात आणून सोडले.
First published on: 12-06-2015 at 12:03 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex plunges by 470 points nifty cracks 8000 level