सलग चौथ्या सत्रात तेजी नोंदविताना मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने बुधवारी आणखी दीडशे अंशांची भर घातली. परिणामी मुंबई निर्देशांक आता २६,८०० च्याही पुढे गेला आहे , तर सत्रात ८,१०० चा टप्पा गाठणारा निफ्टी दिवसअखेर ४४.२५ अंश वाढीने त्यानजीक, ८,०९१.५५ वर राहिला.
विदेशी चलन व्यासपीठावर डॉलरच्या तुलनेत भक्कम होत असलेला रुपया व मान्सूनमध्ये होत असलेली प्रगती लक्षात घेत गुंतवणूकदारांनी बुधवारी खरेदीसाठी जोर लावला. मेमधील व्यापार तूट तिमाहीच्या तळात विसावल्याचा आनंदही गुंतवणूकदारांनी बाजारात खरेदी करत साजरा केला.
मंगळवारीही सेन्सेक्समध्ये जवळपास १५० अंश वाढ झाली होती. तेव्हा विदेशी गुंतवणूकदारांवर ‘मॅट’रूपी कर जबरदस्तीने लादला जाणार नाही, या सरकारच्या ग्वाहीने आलेली निर्धास्तता होती. तर बुधवारी अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हमार्फत जारी होणाऱ्या व्याजदर धोरणावर नजर ठेवत गुंतवणूकदारांनी हिंदुस्थान यूनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रिज, सिप्लासारख्या आघाडीच्या समभागांची खरेदी केली.
सेन्सेक्समधील १९ समभागांचे मूल्य वाढले, तर २.२६ टक्क्यांसह ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक सर्वात आघाडीवर राहिला. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी एक टक्क्यांहून अधिक उंचावले.
गेल्या काही व्यवहारांपासून भांडवली बाजारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदीचे सत्र आरंभले आहे. मंगळवारी त्यांनी ५२१.६५ कोटी रुपयांची खरेदी केली, तर सेन्सेक्समधील सलग चार व्यवहारांतील वाढही ४६१.६८ अंश राहिली आहे. २६,९८३.४८ चा उच्चांकही त्याने गाठला, तर बुधवारच्या तेजीमुळे निफ्टीने सत्रात ८,१००चा टप्पा पुन्हा गाठला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा