वस्तू व सेवा कर अंमलबजावणीची आशादायक वाटचाल
गेल्या दोन व्यवहारातील घसरण भरून काढताना सेन्सेक्सने गुरुवारी जवळपास द्विशतकी निर्देशांक वाढ नोंदविली. २६ हजारानजीक जाताना मुंबई शेअर बाजार यामुळे गेल्या पंधरवडय़ाच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला.
सेन्सेक्स १८२.८९ अंश वाढीसह २५,९५८.६३ वर तर निफ्टी अर्धशतकी निर्देशांक वाढीने, ५२.२० अंश वाढीने ७,८८३.८० पर्यंत पोहोचला. प्रमुख निर्देशांकाचा चालू महिन्यातील सुरुवातीच्या वरच्या स्तरावरील प्रवास राहिला.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भांडवली बाजारातही उत्साह संचारला. बुधवारी गुरुनानक जयंतीमुळे बंद राहिलेल्या बाजारात गुंतवणूकदारांना गुरुवारी खरेदीचे सत्र आरंभले. चालू अधिवेशनात रेंगाळलेल्या वस्तू व सेवा कर विधेयकाचा तिढा सुटण्याच्या आशेने बाजारात समभागांना मागणी नोंदली जाऊ लागली. आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारात संमिश्र चित्र असताना येथे मात्र गेल्या दोन दिवसांच्या घसरणीनंतर तेजीचे चित्र निर्माण झाले.
गुरुवारअखेर २६ हजारानजीक पोहोचताना सेन्सेक्सने ९ नोव्हेंबरनंतरचा उंच टप्पा गाठला. भांडवली बाजारात गुरुवारी महिन्यातील वायदापूर्तीचे अखेरचे व्यवहारही होते. परिणामी गुंतवणूकदारांनी कमी स्तरावरील मूल्यांमध्ये समभागांची खरेदी केली.
सेन्सेक्समध्ये वधारलेल्या समभागांमध्ये टाटा समूहातील टाटा मोटर्स हा ५.५१ टक्क्य़ांसह सर्वात पुढे राहिला. पाठोपाठ सन फार्मा, हिंदाल्को, टाटा स्टील, वेदांता हे तेजीत राहिले. तर घसरलेल्या समभागांमध्ये औषधनिर्माण क्षेत्रातील डॉ. रेड्डीज (८.२१%) हा अमेरिकी अन्न व औषध नियामकाच्या सावधनतेच्या पुन्हा दिलेल्या इशाऱ्यामुळे सर्वाधिक नुकसान सोसणारा ठरला. तर क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, वाहन, पोलाद, ग्राहकपयोगी वस्तू, ऊर्जा तेजीत राहिले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक ०.४५ टक्क्य़ांपर्यंत वाढले होते. सेन्सेक्समधील २१ समभागांचे मूल्य वाढले.
बाजाराची नजर आता पुढील महत्त्वांच्या घडामोडींवर असेल. यामध्ये येत्या ३० नोव्हेंबर रोजीच्या दुसऱ्या तिमाहीतील राष्ट्रीय सकल उत्पादनाची आकडेवारी, १ डिसेंबरचे रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण यांचा समावेश आहे.
वस्तू व सेवा कर विधेयक तिढा सुटण्याच्या आशेने भांडवली बाजारात सूचिबद्ध मालवाहतूक सेवा कंपन्यांचे समभाग मूल्य ८ टक्क्य़ांपर्यंत उसळले. तसेच बिहारमध्ये मद्यविक्री बंदीमुळे या क्षेत्रातील यूनायटेड स्पिरिट्ससह अन्य कंपन्यांचे समभाग त्याच प्रमाणात घसरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लक्षणीय परिणाम नोंदविणारे विशेष समभाग :
टाटा मोटर्स : रु. ४२३.१५ (+५.५१%)
(जग्वार लॅण्ड रोव्हरमध्ये नवी गुंतवणूक करणे)
सन फार्मा : रु. ७३५.९५(+३.९६%)
(अमेरिकेतील ऊर्जा व्यवसायात आखडता हात)
व्हिडिओकॉन : रु. १३५.७० (+४.१४%)
(आयडिया सेल्यूलरला दूरसंचार ध्वनिलहरी विकणे)
ल्युमॅक्स ऑटो : रु. ३७०.०० (+९.५३%)
(भारतीय हवाई व संरक्षण क्षेत्रातील शिरकाव)
(कंसात समभाग मूल्य हालचाल निमित्त)

लक्षणीय परिणाम नोंदविणारे विशेष समभाग :
टाटा मोटर्स : रु. ४२३.१५ (+५.५१%)
(जग्वार लॅण्ड रोव्हरमध्ये नवी गुंतवणूक करणे)
सन फार्मा : रु. ७३५.९५(+३.९६%)
(अमेरिकेतील ऊर्जा व्यवसायात आखडता हात)
व्हिडिओकॉन : रु. १३५.७० (+४.१४%)
(आयडिया सेल्यूलरला दूरसंचार ध्वनिलहरी विकणे)
ल्युमॅक्स ऑटो : रु. ३७०.०० (+९.५३%)
(भारतीय हवाई व संरक्षण क्षेत्रातील शिरकाव)
(कंसात समभाग मूल्य हालचाल निमित्त)