काळ्या सोमवार’चा तडाखा अनुभवल्यानंतर, खालावलेल्या भावात चांगल्या समभागांच्या खरेदीची संधी चाणाक्ष गुंतवणूकदारांनी मंगळवारी साधली. सध्याच्या मलूल जागतिक अर्थस्थितीत भारताच्या अर्थव्यवस्थेची स्थिती तुलनेने बरी असल्याची गुंतवणूकदारांना जाणीव झाल्याचे दिसून आले. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मकतेसह डॉलरच्या तुलनेत व्यवहारात ७५ पैशापर्यंत उंचावणाऱ्या रुपयानेही गुंतवणूकदारांच्या भावना सुखावणारा परिणाम साधला.

२९१ अंशाच्या वाढीने सेन्सेक्स पुन्हा २६ हजारांवर !
* सप्ताहारंभीच सात वर्षांतील सर्वात मोठी आपटी अनुभवणारा भांडवली बाजार मंगळवारच्या व्यवहारात चढ-उताराच्या हिंदोळ्यानंतर दिवसअखेर सावरला. २९०.८२ अंश वाढीने सेन्सेक्स दिवसाच्या अखेरीस २६,०३२.३८ वर स्थिरावला. तर ७१.७० अंश वाढीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीही ७,९०० नजीकच ७,८८०.७० वर थबकला.
दिवसभरात मुंबई निर्देशांक सोमवार बंदच्या तुलनेत ८२६.३५ अंशाने उंचावला होता. या वेळी त्याने २६ हजार पल्याड जाताना २६,१२४.८३ या सत्रातील उच्चांक राखला. यानंतर ८ ऑगस्ट २०१५ रोजीच्या समकक्ष – २५,२९८.४२ या दिवसाचा तळ गाठून सत्राची अखेर तेजीसह केली.
सोमवारच्या तब्बल १,६२४.५१ अंश आपटीमुळे गेल्या तीन व्यवहारांतील मुंबई निर्देशांकाचा स्तर २,१९०.०८ ने खाली आला होता. मंगळवारच्या सुरुवातीपासूनच्या तेजीने निफ्टीलाही सत्रात ७,९२५.४० पर्यंत मजल मारता आली.
सेन्सेक्समधील ३० पैकी २२ समभागांचे मूल्य वाढले. यामध्ये वेदांता, टाटा मोटर्स, कोल इंडिया, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक, एनटीपीसी, टाटा स्टील, गेल, स्टेट बँक, रिलायन्स, भेल, डॉ. रेड्डीज, हिंदाल्को हे बडे समभाग आघाडीवर राहिले.
सोमवारच्या मोठय़ा आपटीमुळे त्या दिवशी सेन्सेक्समधील एकही समभाग तेजीत राहू शकला नव्हता. मंगळवारी माहिती तंत्रज्ञान निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रातील समभाग तेजीत राहिले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकातही प्रत्येकी जवळपास दोन टक्क्यांपर्यंत वाढ नोंदली गेली.

रुपयाची ५५ पैशांची उसळी
डॉलरच्या तुलनेत ६७ नजीक जात दोन वर्षांपूर्वीचा तळ गाठणाऱ्या रुपयाने मंगळवारी एकदम उसळी घेत गेल्या सात महिन्यांतील सर्वोत्तम झेप नोंदवली. चलन विनिमय मंचावर रुपया ५५ पैशांनी उंचावत प्रति अमेरिकी डॉलर ६६.१० पर्यंत पोहोचला.
संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी विरोधकांबरोबर चर्चा सुरू करण्याचे संकेत सरकारने मंगळवारी दिले. या अधिवेशनामुळे वस्तू व सेवा कर, भूसंपादन विधेयकासारखा आर्थिक सुधारणांचा मार्ग मोकळा होण्याच्या आशेने मंगळवारी भांडवली व चलन बाजारातही उत्साह दिसून आला.
भांडवली बाजारातील मोठय़ा आपटीबरोबरच डॉलरमागे ८२ पैशांनी रोडावत रुपयाने सोमवारी ६६.६४ पर्यंत नांगी टाकली होती. सप्ताहारंभाच्या व्यवहारात ६७ च्या वेशीवर पोहोचताना चलनाने गत दोन वर्षांतील नवा तळ नोंदविला होता. मंगळवारी मात्र ६५.४४ अशा तेजीसह सुरुवात करणारा रुपया सत्रात ६५.८७ या वरच्या टप्प्यावर पोहोचला. दिवसअखेर तो सोमवारच्या तुलनेत ०.८३ टक्क्यांनी वाढत ८ जानेवारी २०१५ नंतरची मोठी झेप नोंदविणारा ठरला.

खनिज तेलाचे दरही सावरले
वृत्तसंस्था, लंडन/न्यूयॉर्क : देशांतर्गत बाजारात भांडवली बाजार, व रुपयाचे मूल्य सावरले असताना आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरांमध्येही पुन्हा एकदा उठाव अनुभवला गेला. लंडनच्या बाजारात ब्रेंट तेल ०.४० ने उंचावत ४३.७० डॉलर प्रति पिंप झाले. तर अमेरिकेतील तेलाचे दर ४० डॉलपर्यंत पोहोचले नसले तरी त्यात सोमवारच्या तुलनेत १.१३ डॉलरची भर पडली. सोमवारी ब्रेंट तेल ४५ डॉलरखाली तर अमेरिकेतील तेल दर ४० डॉलरखाली येत चिंता निर्माण झाली होती. चिनी अर्थव्यवस्थेच्या धास्तीने तेल दराने गेल्या साडे सहा वर्षांचा तळ गाठला होता. हे दर २००८ च्या जागतिक मंदीच्या कालावधी समकक्ष होते.

बाह्य़ धक्के पचविण्याइतकी अर्थसक्षमता!
जागतिक अर्थव्यवस्थेने साधलेला (शेअर बाजारातील सोमवारची पडझड) हा विपरीत परिणाम आहे. मात्र असे ‘बाह्य़’ धक्के सहन पचवण्याइतपत भारतीय अर्थव्यवस्था सक्षम नक्कीच आहे. जगभरच्या अर्थव्यवस्थांचे परस्परांशी असलेल्या सांधेजोड असल्याने निर्माण झालेल्या क्षणिक भीतीतून हा परिणाम साधला आहे. अन्य देशांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत आपली अर्थव्यवस्था खूपच समाधानकारक पातळीवर आहे. देशातील सध्याची परकीय चलन गंगाजळी आणि चालू खात्यावरील तुटीच्या प्रमाणाची स्थिती दोन वर्षांपूर्वी कशी (वाईट) होती, हेही नव्या संदर्भात लक्षात घेतले पाहिजे.
’  एस. एस. मुंद्रा, रिझव्‍‌र्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर.

Story img Loader