चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रणाच्या सरकारच्या प्रयत्नांना सप्टेंबरमधील व्यापार तूट कमी होण्याच्या रूपात प्रतिसाद पाहून गुंतवणूकदारांनी बुधवारी सुस्कारा सोडला. जवळपास सर्वच क्षेत्रांतील कंपनी समभागांची जोरदार खरेदी करीत त्यांनी सेन्सेक्सला २० हजारापार नेले तर निफ्टीलाही यामुळे ६ हजाराचा महत्त्वपूर्ण स्तर गाठता आला.
गेल्या तीन आठवडय़ांत प्रथमच अनोख्या टप्प्याला पोहोचलेला सेन्सेक्स बुधवारी २६६.६५ अंश भर पडल्याने २०,२४९.२६ पर्यंत गेला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ७९.०५ अंश वाढ झाल्याने हा निर्देशांक ६,००७.४५ वर दिवसअखेर स्थिरावला.
मंगळवारच्या व्यवहारात सेन्सेक्सला २० हजाराला हुलकावणी दिली. दिवसअखेर तो किरकोळ वाढीवरच त्याला समाधान मानावे लागले. सप्टेंबरमध्ये आयात कमी झाल्याने आणि निर्यात वधारल्याने व्यापार तूट ३० महिन्यांत प्रथमच ६.७ अब्ज डॉलर अशी कमी झाली. याचे अर्थातच स्वागत भांडवली बाजारात सुरुवातीपासूनच्या व्यवहारातच दिसून आले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देशाचा मार्च २०१४ अखेर अंदाजलेल्या ४.२५ टक्के विकासदराकडेही बाजाराने दुर्लक्ष केले. २० सप्टेंबरला गाठलेल्या २०,२६३.७१ या टप्प्यानंतर आज सेन्सेक्सने ही पातळी पुन्हा सर केली आहे.
मुंबई शेअर बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकामध्ये व्याजदर कपातीच्या वृत्तामुळे बांधकाम निर्देशांक सर्वाधिक ४.२७ टक्क्यांनी वधारला. त्याचबरोबर व्याजदराबाबत संवेदनशील बँक आणि भांडवली वस्तू निर्देशांक अनुक्रमे १.८८ आणि १.८६ टक्क्यांनी वधारले. बँक ऑफ इंडिया, येस बँकेसारखे समभाग ४.३ टक्क्यांपर्यंत वधारले. रिलायन्स, इन्फोसिस, सन फार्मा, एचडीएफसी बँक, भेल, टाटा स्टील यांचेही भाव उंचावले.

रुपया, सोन्यात मात्र नरमाई!
डॉलरच्या तुलनेत रुपया आणि मुंबईच्या सराफा बाजारात मौल्यवान धातूंचे दर पुन्हा उतरणीला लागले. कालच्या व्यवहारात ६२ च्या खाली, ६१.७९ असा स्थिर राहिलेला रुपया बुधवारी १४ पैशांनी घसरत ६१.९३ पर्यंत खाली आला. व्यापार तूट गेल्या जवळपास तीन वर्षांच्या नीचांकाला आलेली पाहून आयातदारांनी अमेरिकन चलनाबाबत चिंता व्यक्त केल्याने रुपयावर दबाव निर्माण झाला. परिणामी ६२.०७ अशा खालच्या स्तरावर व्यवहाराची सुरुवात करणाऱ्या रुपयाचा दिवसभरातील प्रवास ६२.३० पर्यंत खालावला. दिवसअखेर त्यात कालच्या तुलनेत १४ पैशांची घसरण नोंदली गेली. सराफा बाजारातही मंगळवारी सोने तसेच चांदीच्या दरात घसरण राखली गेली. १० ग्रॅम सोन्याचा दर २०० रुपयांनी कमी होत ३०,५१० रुपयांवर तर एक किलो चांदीचा भाव ५३५ रुपयांनी कमी होत ५०,५९५ रुपयांवर आला.

Story img Loader