नव्या वर्षांच्या सुरुवातीची तिन्ही दिवसांत शेअर बाजारात प्रमुख निर्देशांकांमध्ये सलग वाढीचा सपाटा सुरूच असून, गुरुवारी सेन्सेक्सने त्यात आणखी ५१ अंशांची भर घातली; तर निफ्टीने दोन वर्षांनंतर प्रथमच ६००० अंशापल्याड विश्राम घेतला. जागतिक स्तरावरील, विशेषत: अमेरिकेतील सकारात्मक आर्थिक घडामोडींच्या परिणामी स्थानिक भांडवली बाजारात चैतन्य निर्माण झाले असून, गेल्या तीन दिवसात सेन्सेक्सने केलेली २८८ अंशांच्या कमाईने याचा प्रत्यय दिला आहे. उल्लेखनीय म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून कमजोर बनलेल्या रुपयाने नावडते ठरलेल्या आय.टी. आणि तेल शुद्धीकरण कंपन्यांच्या समभागांनी गुरुवारी बाजारातील उत्साहाला बळ दिले. विशेषत: तीन दिवसात प्रथमच डॉलरच्या तुलनेत रुपया आज १५ पैशांनी कमजोर होत ५४.५० या पातळीवर पोहचला आहे.
अमेरिकेतील संभाव्य करवाढीच्या व सरकारी खर्चात कपातीच्या संकटाला टाळणारा कायद्याला मिळालेल्या मंजुरीबरोबरीनेच, तेथील ढासळती अर्थव्यवस्था सावरत असल्याचे संकेत देणारे आकडेही पुढे आले आहेत. अमेरिकेतील कारखानदारीचा निर्देशांक आधीच्या महिन्याच्या तुलनेत डिसेंबरमध्ये सुधारला असल्याचे ताजे आकडे सांगतात आणि ही बाब भारतीय आयटी कंपन्यांच्या निर्यात-सेवांना अमेरिकेसारख्या त्यांच्या प्रमुख ग्राहकांकरवी मागणी वाढविणारी ठरेल. याच कयासाने आयटी कंपन्यांच्या समभागांना आज बाजारात मागणी मिळताना दिसली.
सेन्सेक्सचे वर्षअखेर लक्ष्य २१,७०० : एचएसबीसी
स्थानिक बाजारात बीएसई सेन्सेक्स निर्देशांकाची वर्षांरंभी दमदार सुरुवात पाहता, हा निर्देशांक २०१३ अखेर २१,७०० हे नवीन उच्चांकी सर करेल, असा अंदाज ‘एचएसबीसी’ या वित्तसंस्थेच्या ताज्या अहवालाने व्यक्त केला आहे.
जगाच्या तुलनेत आशियाई बाजारांची नजीकच्या भविष्यातील कामगिरी ही लक्षणीय राहील, असा एचएसबीसीच्या या अहवालाचा प्रमुख सार आहे. त्यामुळे सर्वच उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या बाजारांमध्ये गुंतवणुकीची हा अहवाल शिफारस करतो. परंतु आशियाई क्षेत्राचा विचार करता, भारताबाबत ‘तटस्थ’ असाच या अहवालाचा शेरा आहे. म्हणूनच सध्याच्या तुलनेत केवळ ११ टक्के वाढच निर्देशांकात संभवते असा या अहवालाचा कयास आहे. २०१२ साल हे सेन्सेक्ससाठी २५ टक्क्यांहून अधिक कमाईचे राहिले हे लक्षात घ्यावयास हवे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा