मुंबई : भांडवली बाजाराचा प्रमुख निर्देशांक – ‘सेन्सेक्स’ने सोमवारच्या व्यवहारात जवळपास एका टक्क्याची तेजी नोंदवत, पुन्हा ५९,००० अंशांपुढे मजल मारली. जागतिक बाजारात कमकुवत कल असतानाही, मुख्यत: धातू, बँकिंग आणि भांडवली वस्तू क्षेत्रातील समभागांत तीव्र स्वरूपाच्या वाढीमुळे निर्देशांक मोठय़ा फरकाने उसळले.
एका ठरावीक पट्टय़ादरम्यान सीमित राहिलेल्या व्यापारात, सोमवारचा दिवस सरला तेव्हा सेन्सेक्स ४४२.६५ अंश (०.७५ टक्के) वाढून ५९,२४५.९८ पातळीवर स्थिरावलेला दिसला. दिवसभरात त्याने ५०४.९२ अंशांची कमाई करीत ५९,३०८.२५ अशा उच्चांकाला गवसणी घातली होती. दुसरीकडे निफ्टी निर्देशांकाने १२६.३५ अंशांनी (०.७२ टक्के) वाढ साधून १७,६६५.८० या पातळीवर विश्राम घेतला. रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा आणि आयटीसी या निर्देशांकांमधील प्रमुख समभागांतील खरेदी आणि वाढत्या रुपयानेही बाजारातील उत्साहाला खतपाणी घातले.
सप्ताहारंभी तेजी आश्चर्यकारक असून, कमकुवत जागतिक संकेतांना झुगारून तेजीवाल्यांनी बाजारावर नियंत्रण मिळविल्याचा प्रत्यय देणारी आहे. दुसरीकडे ‘ओपेक’च्या बैठकीपूर्वी तेलाच्या किमतीत वाढ झाली. तरी या कशाचाही परिणाम बाजारावर झाला नाही. महत्त्वाचे म्हणजे, डॉलरच्या तुलनेत रुपया आठ पैशांनी वाढून७९.७९ पातळीवर बंद झाला. एकंदर सकारात्मकता असली तरी मंगळवारच्या सत्रात निफ्टीसाठी १७,७५७ चा मोठा अडथळा आहे, असे मेहता इक्विटीजचे प्रशांत तपासे यांनी निरीक्षण नोंदवले.