मुंबई : परदेशी गुंतवणूकदारांचा आशावाद आणि निरंतर समभाग खरेदी सुरू असल्याने मंगळवारी सलग चौथ्या सत्रात तेजीवाल्यांची दौड कायम आहे. देशांतर्गत पातळीवर पुन्हा ७ टक्क्यांवर फेर धरलेल्या किरकोळ महागाई दराची आकडेवारीही गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या उत्साहाला खीळ घालू शकली नाही. परिणामी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक – निफ्टीने चालू वर्षांत एप्रिलनंतर प्रथमच १८,००० अंशांची पातळी ओलांडली.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४५५.९५ अंशांनी म्हणजेच ०.७६ टक्क्यांनी वधारून ६०,५७१.०८ पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने दिवसभरातील सत्रात ६०,६३५.२५ अंशांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. दुसरीकडे निफ्टीने १३३.७० अंशांची कमाई करत १८,०७०.०५ अंशांची पातळी गाठली. चालू आर्थिक वर्षांत ४ एप्रिलनंतर प्रथमच निफ्टीने १८,००० अंशांची महत्त्वपूर्ण पातळी पुन्हा गाठली आहे.

भांडवली बाजारातील तज्ज्ञांच्या मते, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून करण्यात येत असलेल्या समभाग खरेदीमुळे सध्या बाजारात तेजी निर्माण झाली आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून मुख्यत: वित्त आणि ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना प्राधान्य दिले जात आहे. सोमवारच्या सत्रात परदेशी गुंतवणूकदारांनी २,०४९.६५ कोटी रुपये मूल्याची समभाग खरेदी केली. जोडीला किरकोळ गुंतवणूकदारांनी देखील खरेदीला जोर लावल्याने बाजारात तेजीवाल्यांना अधिक बळ मिळाले.

जागतिक बाजारांमध्ये आलेल्या तेजीचे प्रतििबब म्हणून देशांतर्गत भांडवली बाजारात चैतन्याचे वातावरण आहे. अमेरिकेत महागाई कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे आणि त्या परिणामी अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदर वाढीबाबत नरमाईची भूमिका घेण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. चालू महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण आणि फेडरल रिझव्‍‌र्हकडून करण्यात येणारी व्याजदर वाढ बाजाराची पुढील दिशा निश्चित करेल, असे मत जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले. सेन्सेक्समध्ये घसरणीसह बंद झालेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी टीसीएसचा समभागाचा अपवाद केल्यास, बजाज फिनसव्‍‌र्ह, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, टायटन आणि बजाज फायनान्स यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. 

Story img Loader