केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास महिन्याभराचा अवधी असताना भांडवली बाजाराची घोडदौड अनोख्या टप्प्याचे शिखर गाठण्याकडे सुरू आहे. सेन्सेक्सने जवळपास तीनशे अंश झेप घेत आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी २९,५०० पुढील प्रवास नोंदविला. तर पाऊणशे अंश वाढीने निफ्टीनेही ८,९०० ला पार केले.
दोन्ही प्रमुख निर्देशांकांचा त्या – त्या भांडवली बाजारातील हा ऐतिहासिक टप्पा आहे. प्रमुख निर्देशांकांनी सलग आठवडय़ात व्यवहारात तेजी तर सहाव्या सत्रात विक्रम नोंदविला आहे. २९२.२० अंश वाढीने सेन्सेक्स २९,५७१.०४ वर तर ७४.९० अंश भर घातल निफ्टी ८,९१०.५० पर्यंत पोहोचला.
अमेरिकेच्या अध्यक्षांच्या भारतभेटीने भारतातील अर्थव्यवस्थेच्या निर्दशकाने कमालीचा उत्साह नोंदविला आहे. उभय देशांमधील अणुऊर्जा करारामुळे देशात समभागांच्या रुपात विदेशी निधीचा ओघ वाढला आहे. गेल्या आठवडय़ाची अखेर करताना मुंबई शेअर बाजारात शुक्रवारीही २,०१९.९८ कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांकडून ओतले गेले. युरोपीयन मध्यवर्ती बँकेच्या आगामी दीड वर्षे रोखे खरेदीच्या निर्णयानेही देशात विदेशी गुंतवणुकीचा ओघ कायम राहिल, याच आशेवर भांडवली बाजारात तेजीचे व्यवहार सलग नोंदले जात आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात आशियाईतील सिंगापूर, तैवान, जपान, दक्षिण कोरियातील प्रमुख निर्देशांकही १.७२ टक्क्य़ांपर्यंत वधारले. चीन व हाँग काँगमधील निर्देशांकांमध्ये एक टक्केपर्यंत उतार अनुभवला गेला. तर युरोपीय बाजारातील सुरुवातीचे वातावरणही काहीसे नरम होते. तेथे फ्रान्स, जर्मनी, ब्रिटनमधील निर्देशांक अध्र्या टक्क्य़ांची घसरण नोंदवित होते.
सकाळच्या व्यवहारातच ८,८७१.३५ वर सुरू झालेल्या निफ्टीचा प्रवास लगेचच ८,९०० ला पार करता झाला. सत्रात राष्ट्रीय शेअर बाजाराचा हा प्रमुख निर्देशांक ८,९२५.०५ पर्यंत गेला. तर २९,४५१.६५ ने सुरुवात करणाऱ्या मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने सत्रात २९,६१८.५९ पर्यंत झेप घेतली.
भांडवली वस्तू, बँक, वाहन, स्थावर मालमत्ता, ऊर्जा क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. २.३० टक्क्य़ांसह बँक निर्देशांक सर्वाधिक आघाडीवर राहिला. तर भांडवली वस्तू निर्देशांक १.८४ टक्क्य़ांनी उंचावला. एकूण निर्देशांकातील तेजीत गेल्या काही सत्रांपासून नरम असलेले स्मॉल व मिड कॅपही एक टक्क्य़ांच्या आत वधारले.
सेन्सेक्समध्ये अॅक्सिस बँक, सिप्ला, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, आयटीसी, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, लार्सन अॅन्ड टुब्रो, एचडीएफसी लिमिटेड, स्टेट बँक यांच्या समभागांचे मूल्य वाढले. मुंबई शेअर बाजारातील या प्रमुख निर्देशांकातील एकूण १९ समभाग वधारले. तर तेजीतही डॉ. रेड्डीज, इन्फोसिस, महिंद्र अॅन्ड महिंद्र, कोल इंडिया, हिंदुस्थान यूनिलिव्हरला कमी मागणीअभावी नुकसान सोसावे लागले.
सेन्सेक्समधील गेल्या आठ सत्रातील झेप २,२२४.२२ अंश राहिली आहे. टक्केवारीत ती ८ इतकी आहे. तर त्यापैकी पाच व्यवहारात त्याने नवा विक्रम राखला आहे. मुंबई शेअर बाजारातील सोमवारची एकूण उलाढाल ३,९९०.८६ कोटी रुपये नोंदली गेली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा