आठवडय़ाच्या प्रारंभी (सोमवारी) सार्वकालिक उच्चांकावर उत्साही झेप घेणाऱ्या शेअर बाजाराचा निर्देशांक- सेन्सेक्सने गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या २४६ अंशांच्या घसरणीने २१ हजाराखाली बुडी घेतली. सायंकाळी जाहीर होणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक तसेच महागाई निर्देशांकाबाबत प्रतिकूलता तसेच रिझव्र्ह बँकेच्या आठवडय़ाभरावर आलेल्या पतधोरणाबाबत नकारात्मकता गुंतवणूकदारांमध्ये दिसून आली. प्रमुख जागतिक भांडवली बाजारातील घसरणीने आपल्या बाजारातील नकारार्थी भावनेला खतपाणी घातले.
सेन्सेक्समध्ये गुरुवारी घेतलेली गटांगळी ही गेल्या तीन सप्ताहातील सर्वात मोठी घसरण आहे. गेले दोन दिवस वरच्या भावात समभाग विकून नफा पदरी पाडून घेण्याचे धोरण गुंतवणूकदारांनी अनुसरलेले दिसले, तर गुरुवारच्या विक्रीचा टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, आयटीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या बडय़ा समभागांना सर्वाधिक फटका बसला. सलग तीन दिवसांत सेन्सेक्सने ४०० अंश गमावले आहेत. अमेरिकी संसदेत अर्थसंकल्पविषयक तिढय़ावर विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये सामंजस्य घडून आल्याने, तेथील फेडरल रिझव्र्ह या मध्यवर्ती बँकेकडून अर्थउभारीसाठी सुरू असलेल्या रोखेखरेदीला लवकरच आळा बसेल, असे कयास बांधत सर्वच आशियाई बाजारांमध्ये गेले तीन दिवस सुरू असलेली नरमाई आजही दिसून आली. फेडरल रिझव्र्हकडून हे पाऊल टाकले गेल्यास, उदयोन्मुख बाजारांमध्ये खेळत असलेला पैसा पुन्हा अमेरिकेत अधिक परताव्याच्या अपेक्षेने जाईल, असेही कयास बांधले जात आहेत.
रुपया प्रति डॉलर ५८ पैशांनी गडगडला
भांडवली बाजारातील पडझड आणि आयातदारांकडून डॉलरच्या मागणीत वाढीने चलन बाजारात रुपयाची कोंडी केली आणि गुरुवारी त्याने महिन्यातील सर्वात मोठी ५८ पैशांनी आपटी खाल्ली. परिणामी रुपयाची प्रति डॉलर पातळी ६१.८३ वर गेली. अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हकडून रोखेखरेदी अपेक्षेपेक्षा आधीच मागे घेतला गेल्यास, स्थानिक भांडवली बाजारातून विदेशी वित्ताचे पलायन वेग धारण करेल, या भीतीने चलन बाजारातील भावना नकारात्मक बनविल्या. या शक्यतेसाठी पूर्वतयारी म्हणून रिझव्र्ह बँक येत्या आठवडय़ात जशी अपेक्षा केली जात आहे त्यापेक्षा खूप अधिक म्हणजे अर्धा टक्क्य़ांनी रेपो दरात वाढ करेल, अशी बाजारात भीती आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा