मध्यवर्ती बँकेकडून आर्थिक वृद्धीला प्रोत्साहक व्याजदर कपात मंगळवारच्या नियोजित पतधोरण आढाव्याच्या बैठकीत केले जाईल, या आशेने मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने सलग दुसऱ्या सत्रा वाढीसह विश्राम घेतला.
सोमवारी दिवसभरातील अस्थिर प्रवासानंतर, सेन्सेक्स ०.१ टक्क्य़ांच्या माफक पण सकारात्मकत वाढीसह २७,८४८.९९ अंशांवर स्थिरावला. या आधीच्या व्यवहार झालेल्या सत्रात म्हणजे शुक्रवारी याच आशेच्या हिंदोळ्यावर झुलताना सेन्सेक्सने त्रिशतकी अर्थात ३२२ अंशांची वाढ नोंदविली आहे.
निफ्टी निर्देशांक मात्र सोमवारच्या व्यवहारात आहे त्या पातळीवरच, पाव अंशांची नुकसान दाखवीत स्थिरावला. सेन्सेक्सवगळता अन्य प्रमुख निर्देशांक अत्यंत्र त्रोटक घसरणीसह बंद झाले. खासगी बँकांच्या समभागांमध्ये नफावसुलीसाठी घसरण दिसून आली. एल अॅण्ड टीचा समभाग सेन्सेक्समध्ये सर्वोत्तम वाढ दर्शविणारा समभाग ठरला.
रुपयालाही उत्साही बळ
चलन बाजारातही सोमवारचे व्यवहार हे रिझव्र्ह बँकेच्या धोरणात्मक निर्देशांबाबत अंदाज बांधण्यावर खिळलेले दिसले. या बाजारालाही कपातीच्या सकारात्मक निर्णयाची आस असल्याचे रुपयाने व्यवहारात प्राप्त केलेल्या मजबुतीने स्पष्ट केले. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ११ पैशांनी मजबूत होऊन ६३.७० वर स्थिरावला.