निफ्टीने ७७५० ची पातळी तोडली; सेन्सेक्सची २०७ अंश घसरण
भांडवली बाजाराला पुन्हा बाह्य़ घडामोडींचा प्रभाव वाढत असल्याचे मंगळवारच्या सलग दुसऱ्या निर्देशांकातील मोठी घसणीने स्पष्ट केले. सोमवारी सप्ताहारंभी पुन्हा कंपन्यांच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांबाबत चिंता वाहताना निर्देशांक गडगडले होते.
मंगळवारी प्रारंभीचे व्यवहार गुंतवणूकदारांनी मोठय़ा उत्साहाने व खरेदीने केले परिणामी सेन्सेक्सने द्विशतकी उसळी दर्शविली होती. परंतु उत्तरार्धात विशेषत: मध्यान्हीला खुले झालेल्या कमजोर युरोपीय बाजारातील नकारात्मकतेचे बाजारावर दडपण जाणवले. बँक, आयटी आणि पायाभूत क्षेत्रातील समभागांची विक्रीचा जोर चढला. हा नकारार्थी सूर बाजारातील व्यवहार थंडावेपर्यत कायम राहिला. परिणामी सेन्सेक्स २०७ अंशांनी घसरून, २५,२२९ या दोन आठवडय़ांपूर्वीच्या नीचांकाला पोहचला. तर निफ्टीने ५९ अंशांच्या घसरणीसह तांत्रिकदृष्टय़ा महत्त्वाची असलेली ७७५० ची पातळी तोडली.
गेल्या सप्ताहाच्या अखेरच्या टप्प्यात आयसीआयसीआय बँकेने दशकातील सुमार तिमाही निकाल नोंदवित बँकसह एकूणच बाजारात अस्वस्थता निर्माण केली होती. बँकांच्या समभागात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही मोठी घसरण कायम राहिल्याचे दिसून आले.
क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक, माहिती तंत्रज्ञान यातील समभागांना घसरणीचा सामना करावा लागला.