अमेरिकेतील सुटलेला अर्थ-तिढा आणि दोन दशकांच्या नीचांकातून वर येत चीनने गाठलेला विकास दर अशा दोन जागतिक मोठय़ा अर्थसत्तांमधील सकारात्मकतेच्या जोरावर भारतातील भांडवली बाजारांने शुक्रवारी अनोख्या तेजीची चाल केली. तब्बल ४७६.३८ अंशांची झेप घेत सेन्सेक्स २०,९३२.४८ असा गेल्या तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला. तर १४३.५० अंशांची वाढ नोंदविणारा निफ्टी ६,१८९.३५ देखील या नोव्हेंबर २०१० नंतरच्या वरच्या टप्प्यावर स्थिरावला. अमेरिकेतील कर्ज मर्यादा वाढीसह ‘शटडाऊन’चा पेचप्रसंग निकाली निघाल्याने जगभरातील भांडवली बाजारात तेजी नोंदली गेली. जपान वगळता इतर आशियाई बाजारात सकाळच्या व्यवहारात निर्देशांकांनी मोठय़ा उडय़ा घेतल्या. चीनमधील ७.८ टक्के तिमाही विकास दराची या उत्साहाला जोड मिळाली. चीनने आधीच्या तिमाहीत ७.५ टक्के अशी दोन दशकांतील नीचांकी वाढ नोंदविली होती. परिणामी स्थानिक बाजाराची सुरुवातही मोठय़ा तेजीसह झाली. सेन्सेक्स सकाळी २०,५०० च्या पुढे खुला झाला. तर निफ्टीतही या वेळी ४० हून अधिक अंशांची वाढ होती. फायद्यातील निकाल देणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कंपनी समभागांना असलेला खरेदीदारांचा पाठिंबा शुक्रवारी बाजारात पाहायला मिळाला. जोडीला वित्त क्षेत्रातील समभागांचे मूल्य वधारले.

७५ समभागांचा वर्षांतील उच्चांक
शुक्रवारी ७५ समभागांनी त्यांचा वर्षांतील सर्वाधिक भाव स्तर गाठला. सेन्सेक्समधील केवळ बजाज ऑटो (-०.५६%) हा एकच समभाग घसरणीसह बंद झाला. बाजाराच्या वधारणेत सर्व १३ क्षेत्रीय निर्देशांक उंचावले. निर्देशांकांची चढती भाजणी बाजारात खरेदीचा उत्साह दर्शविणारा होती. सेन्सेक्सचा दिवसअखेरचा स्तरच त्याचा दिवसाचा उच्चांक ठरला.  
गुंतवणूकदार लाख कोटींनी मालामाल
सेन्सेक्सच्या जवळपास ५०० अंशांच्या शुक्रवारच्या उसळीने गुंतवणूकदारांची मालमत्ताही १.०७ लाख कोटी रुपयांनी वधारली. सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजारातील सर्व कंपन्यांची बाजार मत्ता ६७,२३,८५२.७८ कोटी रुपये झाली. मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी २,०९१.६२ कोटी रुपयांची उलाढाल नोंदली गेली, ज्यात सर्वाधिक योगदान विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचे राहिले. गुरुवारी त्यांनी  १,१०९.९३ कोटी रुपयांची खरेदी केली होती. सलग १० दिवसांच्या कालावधीत त्यांची एकूण गुंतवणूक ७,८४७ कोटींची आहे. जानेवारी २०१३ पासून आतापर्यंत त्यांची गुंतवणूक ८०० अब्ज रुपयांची आहे.

Story img Loader