विदेशी संस्थांच्या गुंतवणुकीने स्फुरलेल्या आपल्या सार्वकालिक उच्चांकाला मागे सारण्याची कामगिरी सलग तिसऱ्या दिवशी भांडवली बाजाराने सोमवारी केली. मात्र सोमवारच्या व्यवहारात ‘सेन्सेक्स’ने २२ हजारांचा अभूतपूर्व पल्लाही गाठला. मात्र दिवसअखेर त्यापासून फारकत घेत सेन्सेक्स अवघ्या १५ अंशांच्या वाढीने तरी नव्या टप्प्यावर विराजमान होत विसावला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक- सेन्सेक्सने सप्ताहारंभी २२ हजाराला प्रथमच गाठत २२,०२३.९८ पर्यंत मजल मारली. तर निफ्टीनेही सत्रात ६,५६२.२० हा सर्वोच्च टप्पा गाठला. दोन्ही निर्देशांकांना या भावनिकदृष्टय़ा महत्त्वाच्या पातळ्या टिकविता आल्या नसल्या तरी त्यांनी नव्या उच्चांकावरच दिवसअखेर विश्राम घेतला. निफ्टी १०.६० अंश वधारणेसह ६,५३७.२५ वर बंद झाला. सोमवारी भांडवली वस्तू, बांधकाम, बँक, तेल व वायू क्षेत्रातील समभागांना मागणी राहिली. तर माहिती तंत्रज्ञानासह औषधनिर्मिती, पोलाद क्षेत्रातील समभागांची विक्री झाली.
प्राथमिक माहितीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी बाजारात १,२५३.६५ कोटी रुपयांची समभाग खरेदी केली. २२ हजारापर्यंत जाताना सेन्सेक्सने गेल्या सलग पाच सत्रात तब्बल ९८८ अंशांची वाढ नोंदविली आहे. २१,९१९.७९ हा उच्चांक गाठणाऱ्या शुक्रवारीही भांडवली बाजारात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी २,५७७.४४ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी करून गुंतवणूक केली होती. सेन्सेक्समधील एचडीएफसी बँक, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, रिलायन्स, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, स्टेट बँक, मारुती सुझुकी, हिंदुस्थान यूनिलिव्हर यांचे समभाग मूल्य वाढले. सेन्सेक्सच्या १५ समभागांची खरेदी झाली, तर निम्मे घसरणीच्या यादीत राहिले.
रुपया सात महिन्यांच्या उच्चांकावर; प्रति डॉलर ६०.८५
नव्या आठवडय़ाची सुरुवात करताना सलग पाचव्या व्यवहारात रुपया भक्कम होताना गेल्या सात महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन सोमवारी २२ पैशांनी उंचावर जात ६०.८५ पर्यंत गेले. भांडवली बाजाराच्या व्यवहारात २२,००० स्पर्श करणाऱ्या सेन्सेक्समुळे एकूणच गुंतवणूकदारांचा ओघ राहिला आणि परिणामी अमेरिकन चलनाची विक्रीही वाढली. आंतरराष्ट्रीय बाजारात अन्य चलनांच्या तुलनेत वधारलेल्या डॉलरचा येथे काहीएक परिणाम दिसून आला नाही. उलट ६१.२६ अशी नरम सुरुवात करणारा रुपया व्यवहारात ६१.३४ पर्यंत खाली आला. मात्र ६०.७९ हा सत्राचा उच्चांक राखणाऱ्या स्थानिक चलनाने ६ ऑगस्ट २०१३ नंतरच्या ६०.७७ या स्तरानजीक राहणे पसंत केले. सोमवारी ०.३६ टक्के वाढ नोंदविणाऱ्या रुपयाने गेल्या पाचही सत्रातील मिळून ११९ पैशांची झेप नोंदविली आहे. भांडवली बाजाराप्रमाणेच परकी चलन व्यवहारानेही सलग पाचव्या व्यवहारात तेजी राखली आहे

Story img Loader