नव्या आर्थिक वर्षांची सुरुवात मुंबई शेअर बाजाराने निर्देशांकांत त्रिशतकी वाढ नोंदवित केली. सेन्सेक्स बुधवारी ३०२.६५ अंशांनी उंचावत २८ हजारांच्या पुढे जाताना २८,२६०.१४ पर्यंत झेपावला. सत्रात ८,६०० पर्यंत झेपावणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी दिवसअखेर मंगळवारच्या तुलनेत जवळपास शतकी वाढ, ९५.२५ अंश भर घालत ८,५८६.२५ वर बंद झाला.

गुरुवारी महावीर जयंती व शुक्रवारी गुड फ्रायडेनिमित्त भांडवली बाजारात व्यवहार होणार नाहीत. शनिवार व रविवारी बाजार बंद असतो. त्यामुळे पुढील सोमवारी, ६ एप्रिल रोजीच बाजारातील व्यवहार होऊ शकतील. त्यामुळे चालू आठवडय़ात तीन दिवस व्यवहार नोंद करणाऱ्या मुंबई निर्देशांकाने तीन सप्ताहांतील सर्वोत्तम सप्ताहप्रवास यंदा नोंदविला आहे.
आर्थिक वर्ष २०१४-१५ची सुरुवात करताना बुधवारी सेन्सेक्स सकाळच्या व्यवहारात काहीसा नरमच होता. २७,९५४.८६ वर त्याचा प्रवास सुरू झाला. सत्रात तो २७,८८९.०२ पर्यंत उतरला. दिवसअखेरच्या टप्प्यात त्यात तेजी नोंदली गेली. व्यवहारात २८,२९८.३४ पर्यंत झेपावल्यानंतर त्यात दिवसअखेर काहीशी नरमाई आली.
व्यवहारातील मधील सत्रापर्यंतच्या नरम वातावरणात फेब्रुवारीत प्रमुख आठ उद्योग क्षेत्राने नोंदविलेल्या १.४ टक्के घसरणीचा हिस्सा राहिला. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूसह आठपैकी पाच क्षेत्रांमध्ये महिन्याभरापूर्वी घसरण नोंदली गेली आहे. तर युरोपातील सुरुवातीचे व्यवहार व आशियाई बाजारातील संमिश्र हालचाल दिवसअखेर मात्र स्थानिक बाजारावर विपरीत परिणाम करणारी ठरली नाही.
तब्बल ५.५१ अंश मूल्यवाढीने सन फार्मा सेन्सेक्समध्ये सर्वात वरचढ ठरला. तर टाटा मोटर्स, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, टाटा स्टील, आयटीसी, भारती एअरटेलही मुंबई निर्देशांक वाढीत सहभागी झाले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बँक निर्देशांक सर्वाधिक २.३७ टक्क्यांसह वाढला.

बँक निफ्टी निर्देशांक अडीच टक्के उसळला
गेले अनेक दिवस पडझड अनुभवणाऱ्या बँकांच्या समभागांनी मिळविेलेल्या मागणीचे निर्देशांकांच्या वाढीत मोठे योगदान राहिले. सलग दोन दिवसांच्या सुट्टय़ांमुळे बाजारात व्यवहार होणार नाहीत. तर त्यानंतर पुढील आठवडय़ात मंगळवारी रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण आहे. त्याबाबत सकारात्मकतेतून बँकांच्या समभागांची बुधवारी मोठी खरेदी होताना दिसून आले.

Story img Loader